Monday, September 28, 2026

Indian Railways : दसरा-दिवाळीत घरवापसी सोपी! पुणे आणि हडपसरहून विदर्भ अन् उत्तर भारतासाठी विशेष रेल्वे गाड्या जाहीर

Indian Railways : दसरा-दिवाळीत घरवापसी सोपी! पुणे आणि हडपसरहून विदर्भ अन् उत्तर भारतासाठी विशेष रेल्वे गाड्या जाहीर

पुणे : आगामी दसरा, दिवाळी आणि छठपूजा या सणांच्या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे आणि हडपसरवरून विदर्भासह उत्तर भारतासाठी विविध विशेष रेल्वे गाड्या (Special Trains) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांमुळे सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर आणि आरामदायक होणार आहे.(Pune Railway News)

1. पुणे – न्यू अमरावती साप्ताहिक विशेष रेल्वे (12 फेऱ्या)

विदर्भाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे आणि न्यू अमरावतीदरम्यान 12 फेऱ्यांची साप्ताहिक वातानुकूलित विशेष रेल्वे धावणार आहे.

  • गाडी क्रमांक 01403 (पुणे ते न्यू अमरावती): ही गाडी 13 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान दर मंगळवारी सायंकाळी 7:55 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:05 वाजता न्यू अमरावती येथे पोहोचेल.
  • परतीची गाडी क्रमांक 01404: ही गाडी 14 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी दुपारी 12:00 वाजता न्यू अमरावतीहून निघून दुसऱ्या दिवशी रात्री 12:15 वाजता पुण्यात येईल.
  • प्रमुख थांबे: दौंड कॉर्डलाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा.

2. हडपसर – गाझीपूर सिटी द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वे (24 फेऱ्या)

उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हडपसर ते गाझीपूर सिटीदरम्यान 24 फेऱ्यांची विशेष रेल्वे चालवली जाणार आहे.

  • गाडी क्रमांक 01431 (हडपसर ते गाझीपूर सिटी): ही गाडी 13 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी 6:55 वाजता हडपसरहून सुटेल आणि पुढील दिवशी रात्री 8:15 वाजता गाझीपूर सिटी येथे पोहोचेल.
  • परतीची गाडी क्रमांक 01432: ही गाडी 15 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी आणि रविवारी पहाटे 4:00 वाजता गाझीपूर सिटीहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 4:20 वाजता हडपसर येथे परतेल.

प्रवाशांना मोठा दिलासा

सणांच्या काळात नियमित गाड्यांचे तिकीट मिळवणे कठीण होते आणि प्रवाशांना मोठी गर्दी सहन करावी लागते. मात्र, प्रशासनाच्या या विशेष नियोजनामुळे विदर्भ आणि उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी हेळसांड थांबणार असून त्यांचा प्रवास सुखकर होईल. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांच्या नियोजनाचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर आपली तिकिटे आरक्षित करावीत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(Pune Railway News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >