Monday, September 28, 2026

Nashik Shalarth ID Scam : उपासनी, हिंगोणेकर यांच्या जामिनावर सुनावणी, 841 बनावट आयडींचा तपास

Nashik Shalarth ID Scam : उपासनी, हिंगोणेकर यांच्या जामिनावर सुनावणी, 841 बनावट आयडींचा तपास

Nashik Shalarth ID Scam : बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गेल्या नऊ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी आणि जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या जामीन अर्जावर आज, २८ सप्टेंबर रोजी, नाशिकरोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना नाशिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीसंदर्भात मोठ्या प्रमाणात अनियमितता समोर आल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. तपासादरम्यान १२४ प्रकरणांमध्ये अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष डेटामध्ये मोठी विसंगती आढळल्याचे सांगण्यात आले आहे.

एकाच जावक क्रमांकावर वेगवेगळे आदेश

तपासानुसार, एकाच जावक क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या नावांनी आदेश जारी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या माध्यमातून शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. नाशिक विभागातील तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी ६३८ प्रकरणे एकट्या जळगाव जिल्ह्यातील असल्याचे तपासात समोर आले आहे.

गरुड बंधूंच्या जामीन अर्जावरही पुढील महिन्यात सुनावणी

या प्रकरणातील तपासाचा संबंध संस्थात्मक आणि राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. शेंदूर्णी (जामनेर) येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड आणि त्यांचे बंधू दीपक गरुड यांनीही जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. संजय गरुड यांच्या जामीन अर्जावर ३ ऑक्टोबर रोजी, तर दीपक गरुड यांच्या अर्जावर ७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला आहे. या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराच्या स्वरूपाची दखल घेत अतिरिक्त सत्र न्यायालयाने यापूर्वी आर्थिक गुन्हे समाजासाठी गंभीर स्वरूपाचे असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

हिंगोणेकर , उपासनीच्या जामिनाकडे लक्ष

सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी यापूर्वी वैद्यकीय कारणास्तव कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्जही प्रलंबित राहिल्यानंतर फेटाळण्यात आल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम कायम राहिला. आता नव्या युक्तिवादासह उपासनी यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर आज सुनावणी होत आहे. जळगावचे माजी शिक्षणाधिकारी आणि साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्यावर बनावट प्रस्तावांना गैरमार्गाने मंजुरी दिल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होणार असल्याने या सुनावणीकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत आठ संशयित अटकेत

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आतापर्यंत आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

1. नितीन उपासनी – सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक 2. शशिकांत हिंगोणेकर – माजी शिक्षणाधिकारी 3. किरण पाटील 4. राहुल पवार 5. प्रशांत वाडीले – संस्थाचालक व एजंट 6. संजय गरुड – संस्थाचालक व भाजप पदाधिकारी 7. दीपक गरुड – सहसचिव 8. तुषार साळुंके – लॅब असिस्टंट

आजच्या सुनावणीत नितीन उपासनी आणि शशिकांत हिंगोणेकर यांना जामीन मिळतो की त्यांचा कारागृहातील मुक्काम कायम राहतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >