Nashik Crime : आर्थिक फसवणुकीपुरती मर्यादित राहिलेली सायबर गुन्हेगारी आता व्यक्तीच्या खासगी आयुष्यापर्यंत पोहोचली आहे. नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरात एका 38 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तिच्या शालेय जीवनातील वर्गमित्रावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मोबाईलमध्ये रिमोट ॲक्सेस ॲप डाऊनलोड करून महिलेचा फोन हॅक केला आणि त्यानंतर अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कैलास उर्फ बंटी मिस्तरी (रा. नाशिक) याच्याविरोधात एमआयडीसी अंबड पोलिस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावरून पुन्हा संपर्क
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला शेअर मार्केटशी संबंधित व्यवसाय करत होती. कैलास मिस्तरी हा तिचा शालेय जीवनातील वर्गमित्र होता. काही महिन्यांपूर्वी दोघांची पुन्हा भेट झाली आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यात संवाद सुरू झाला. महिलेच्या शेअर मार्केट व्यवसायात सहभागी होण्याच्या बहाण्याने मिस्तरीने तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्याकडून ओळखपत्रे घेतल्याचेही तपासात समोर आले आहे.
रिमोट ॲक्सेस ॲपच्या माध्यमातून मोबाईलचा ताबा
तांत्रिक मदतीचे कारण सांगून संशयिताने महिलेच्या मोबाईलमध्ये एनीडेस्क (AnyDesk) हे रिमोट ॲक्सेस ॲप डाऊनलोड करून घेतल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. या ॲपच्या माध्यमातून तिच्या नकळत मोबाईलचा ॲक्सेस मिळवल्याचा आरोप आहे. मोबाईलचा ॲक्सेस मिळाल्यानंतर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधण्यात आला. व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडून त्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले आणि त्यानंतर या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.
Nashik Crime : न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असलेल्या नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातूनच मोठ्या आर्थिक ...
मानसिक त्रासातून महिलेची आत्महत्या
सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे तसेच बदनामीच्या भीतीमुळे महिला मानसिक तणावाखाली होती, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 3 सप्टेंबर रोजी महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या घटनेची एमआयडीसी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान पोलिसांच्या हाती महिलेने लिहिलेली सुसाईड नोट लागली.
सुसाईड नोटमुळे प्रकरणाला वेगळे वळण
सुसाईड नोटमध्ये कैलास मिस्तरीकडून झालेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या पुराव्याच्या आधारे महिलेच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून कैलास मिस्तरी पसार आहे. सहाय्यक निरीक्षक दिलीप भंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून पोलिसांची पथके संशयिताचा शोध घेत आहेत.
सायबर सुरक्षेबाबत गंभीर इशारा
या घटनेमुळे रिमोट ॲक्सेस ॲप्सचा वापर करताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. एनीडेस्क, टीमव्ह्यूअर यांसारखी ॲप्स अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे किंवा रिमोट ॲक्सेसची परवानगी देणे धोकादायक ठरू शकते. विशेषतः ओळखीची व्यक्ती असली तरी मोबाईलचा रिमोट ॲक्सेस, OTP, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची गरज आणि सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे. ब्लॅकमेलिंग किंवा सायबर छळाचा प्रकार घडल्यास घाबरून न जाता तातडीने पोलिस किंवा संबंधित सायबर यंत्रणेशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.





