मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता मोठा बदल होणार आहे. सन 2037 पर्यंत एसटीचा 100% ताफा इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामुळे पारंपरिक डिझेल बसेसचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी होऊन भविष्यात महाराष्ट्राची ‘लालपरी’ ‘ई-लालपरी’ म्हणून धावणार आहे. (MSRTC)
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. एसटीच्या मुख्यालयात झालेल्या महामंडळाच्या 312 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा करण्यात आली.
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे 14,000 बसेस आहेत. त्यापैकी सुमारे 1,100 बसेस ई-बसेस आहेत. दरम्यान, ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे 5,000 नवीन डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल बसेस ठरणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्यानंतर नव्या बसेसची खरेदी प्रामुख्याने इलेक्ट्रिक स्वरूपात केली जाणार आहे.(MSRTC)
Nashik Shalarth ID Scam : बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गेल्या नऊ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले सेवानिवृत्त ...
2027 पासून जुन्या बसेसचे ई-बसमध्ये रूपांतर
एसटीच्या 7 ते 8 वर्षे वापरलेल्या जुन्या बसेसचे 2027 पासून टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन नव्या ई-बसेसची मोठ्या प्रमाणावर खरेदीही केली जाणार आहे.(MSRTC)
सध्या डिझेल बसेसचे आयुर्मान सुमारे 15 वर्षे, तर ई-बसेसचे आयुर्मान सुमारे 20 वर्षे आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेसचा अधिक काळ वापर करता येणार असून, डिझेलवरील अवलंबित्व कमी झाल्याने इंधन खर्चातही बचत होण्याची अपेक्षा आहे.(MSRTC)
कल्याण: कल्याण- डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण- डोंबिवली महानगपालिका क्षेत्रामध्ये उद्या अर्थात 29 सप्टेंबर रोजी पाणी कपात केली जाणार ...
चार्जिंग स्टेशनचीही तयारी
ई-बसेसची संख्या वाढवताना त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, विद्युत पायाभूत सुविधा आणि तांत्रिक यंत्रणा उभारण्याचे कामही समांतरपणे केले जाणार आहे. आगारनिहाय नियोजन करून ई-बसेसची खरेदी आणि चार्जिंग सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.(MSRTC)
“एसटी ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला जोडणारी सार्वजनिक सेवा आहे. तिचे आधुनिकीकरण करताना पर्यावरणाची जबाबदारीही महत्त्वाची आहे. डिझेलवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ, हरित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्याचा संकल्प आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
म्हणजेच, आजची लालपरी भविष्यात अधिक पर्यावरणपूरक आणि आधुनिक रूपात रस्त्यावर धावणार आहे. 2037 पर्यंत 100% इलेक्ट्रिक एसटी ताफ्याचे लक्ष्य पूर्ण झाल्यास महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडणार आहे.(MSRTC)






