Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खासगी ‘टेंट सिटी’; नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून SOP निश्चित

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या निवासाची अतिरिक्त व्यवस्था करण्यासाठी खासगी जमिनीवर ‘टेंट सिटी’ उभारण्यासंदर्भात नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने सविस्तर कार्यपद्धती (SOP) निश्चित केली आहे. खासगी जमीनमालक तसेच जमीनमालकाशी नोंदणीकृत सामंजस्य करार (MOU) केलेल्या संस्थांना या टेंट सिटीसाठी अर्ज करता येणार आहे.


कुंभमेळ्याच्या काळात शहरातील कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवर वाढणारा ताण कमी करण्यासोबतच भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त निवास उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रस्तावित टेंट सिटीमध्ये निवासासोबतच स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, वाहनतळ, भोजन व्यवस्था, सुरक्षा आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल.



किमान दोन एकर खासगी जमीन आवश्यक


टेंट सिटी उभारण्यासाठी प्रस्तावित जमीन खासगी मालकीची, सलग आणि बोजामुक्त असणे आवश्यक आहे. जमीन नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत असावी आणि तिचे क्षेत्रफळ किमान दोन एकर असणे बंधनकारक आहे. जमीनमालक स्वतः किंवा जमीनमालकाशी नोंदणीकृत MOU असलेला ऑपरेटर अर्ज करू शकणार आहे. टेंट सिटी ही तात्पुरती व्यवस्था असणार असून, मंजूर कालावधी संपल्यानंतर सर्व तंबू आणि इतर तात्पुरत्या संरचना हटवून जमीन पूर्ववत करणे संबंधित ऑपरेटरसाठी बंधनकारक राहणार आहे.



नदी-नाल्यांमध्ये सांडपाणी सोडण्यास बंदी


टेंट सिटीमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने विशेष निकष लागू करण्यात आले आहेत. पुरेशा संख्येने स्वच्छतागृहे व स्नानगृहे उपलब्ध करून देण्याबरोबरच दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधांचीही व्यवस्था करावी लागणार आहे. नदी, नाला किंवा कोणत्याही नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात सांडपाणी सोडण्यास पूर्णपणे मनाई असेल. तसेच उघड्यावर कचरा टाकणे किंवा कचरा जाळण्यासही परवानगी दिली जाणार नाही.



पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी


टेंट सिटीमध्ये पिण्याचे तसेच इतर वापराचे पाणी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. बिगर-पर्वणीच्या कालावधीत सात दिवसांतून किमान एकदा, तर प्रमुख पर्वणीच्या काळात दररोज पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करणे आवश्यक राहणार आहे. या तपासणीची नोंदही ठेवावी लागणार आहे. कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण करणे, अधिकृत संस्थेमार्फत दररोज कचरा संकलित करणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार त्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक असेल. शक्य त्या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर कंपोस्टिंग किंवा बायोमिथेनेशनद्वारे प्रक्रिया करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.



अग्निसुरक्षेसह आपत्कालीन व्यवस्थेवर भर


प्रत्येक टेंट सिटीसाठी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने स्वतंत्र आपत्कालीन कृती आराखडा तयार करावा लागणार आहे. यामध्ये आग लागणे, गर्दीचे व्यवस्थापन, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, स्थलांतर तसेच हवामानाशी संबंधित इशाऱ्यांचा समावेश करावा लागणार आहे. वीज व्यवस्थेसाठीही स्वतंत्र सुरक्षा निकष लागू करण्यात आले आहेत. सर्व वायरिंग सुरक्षित आणि संरक्षित असणे, अर्थ-लीकेज सर्किट ब्रेकर बसविणे तसेच भाविकांना निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्यापूर्वी विद्युत सुरक्षा तपासणी करून घेणे आवश्यक असेल.



टेंट सिटीसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच


खासगी टेंट सिटी उभारण्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अर्जासोबत प्रस्तावित जागेची माहिती, जमीनमालकीची कागदपत्रे, GPS निर्देशांक, टेंट सिटीचा आराखडा, तंबूंची संख्या व प्रकार, वाहनतळाची व्यवस्था, पाणी, वीज व सांडपाणी व्यवस्थेचा तपशील, अग्निसुरक्षा उपाययोजना तसेच ऑपरेटरचा अनुभव आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. प्राप्त प्रस्तावांची संबंधित विभागांकडून छाननी करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभागाशी संबंधित आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) तसेच वैधानिक परवानग्या घेणे ऑपरेटरसाठी बंधनकारक राहणार आहे.



सुरक्षित आणि नियोजनबद्ध निवास व्यवस्था


सिंहस्थ काळात भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता अतिरिक्त आणि नियोजनबद्ध निवास व्यवस्था निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण न आणता भाविकांना सुरक्षित व सुविधायुक्त निवास मिळावा, यासाठी टेंट सिटीसाठी सुरक्षा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि आपत्कालीन तयारीचे स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत.


नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येऊ न देता भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त निवास मिळावा, यासाठी टेंट सिटीसाठी सुरक्षा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि आपत्कालीन तयारीचे स्पष्ट निकष निश्चित केले आहेत. खासगी जमीनमालक आणि ऑपरेटर यांना सिंहस्थाच्या व्यापक व्यवस्थेत सहभागी होण्याची संधीही या माध्यमातून मिळणार आहे,” असे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai- Ahamadabad Bullet Train Project: महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, भिवंडीमध्ये पहिल्या स्टील पूलाची उभारणी

ठाणे: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंबंधित महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये

आजवरचे सर्व विक्रम मोडले..! भारतीय गोलंदाजाची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, असा रचला इतिहास

भारतीय महिला संघाची स्टार फिरकीपटू श्री चरणी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.त्याचं फळंही तिला मिळताना दिसत आहे.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या वेळापत्रकाची या तारखेला होणार घोषणा, जाणून घ्या

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं यजमानपद तीन देशांकडे आहे. दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे देश यजमान आहेत.

Devendra Fadnavis : पदवीपुरते शिक्षण पुरेसे नाही, बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्यविकास आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोकण, नाशिक विभागातील महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ मुंबई : देशातील युवा शक्तीला रोजगारक्षम बनविण्यासाठी

Asian Games 2026 : “हे सुवर्णपदक मला माझ्या आईच्या गळ्यात घालायचे आहे!” : आशियाई स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या नीरू धांडाची भावूक प्रतिक्रिया

ऐची-नागोया : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा (Asian Games 2026) स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप शूटिंग प्रकारात

Ahilyanagar News: जिल्हा बँकेच्या जेवणाच्या पंगतीवर FDAचा छापा, केटररकडे परवानाच नाही

अहिल्यानगर (प्रतिनिधी): जिल्हा बँकेच्या सोमवारी झालेल्या सभेनंतर केशर गुलाब मंगल कार्यालयात झालेल्या