Tuesday, September 29, 2026

Recruitment Exam Reform : भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा; 30 हजार सूचनांनंतर टास्क फोर्सचा सखोल अभ्यास

Recruitment Exam Reform : भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा; 30 हजार सूचनांनंतर टास्क फोर्सचा सखोल अभ्यास

मुंबई : राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, प्रभावी आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून विविध विभागांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे. आतापर्यंत सुमारे 1,500 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद झाला असून, परीक्षा प्रक्रिया सुधारण्यासाठी तब्बल 30 हजार सूचना ई-मेलद्वारे प्राप्त झाल्या आहेत. (Recruitment Exam Reform)

टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाणार आहे. परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल. केवळ शिफारसी न करता प्रत्यक्ष अडचणी दूर करण्यावर टास्क फोर्सचा भर राहणार आहे.

उच्चस्तरीय टास्क फोर्सने पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरनंतर कोकण विभागातील उमेदवारांशी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला. प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सूचना वेगवेगळ्या असल्याचे यावेळी निदर्शनास आले. कोकण विभागातील संवादानंतर नाशिक विभागातही उमेदवारांशी चर्चा करण्यात येणार आहे.(Recruitment Exam Reform)

परीक्षा प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षेतील दिरंगाई टाळणे, परीक्षा पारदर्शक करणे, वेळेवर माहिती उपलब्ध करून देणे, परीक्षा पॅटर्नमधील बदलांची पूर्वसूचना देणे, प्रलंबित परीक्षा लवकर घेणे यांसह विविध मागण्या मांडल्या.

याशिवाय गट-कची सर्व पदे एकाच भरती प्रक्रियेत भरणे, दोन परीक्षांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे, एक पद-एक परीक्षा पद्धतीचा विचार करणे, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा विचार करणे, वर्णनात्मक प्रश्नपत्रिका सुरू करणे, एकदाच नोंदणी व शुल्क आकारणी करणे तसेच प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका आणि पेपर तपासणी अधिक पारदर्शक करणे, अशा सूचना विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.(Recruitment Exam Reform)

परीक्षानिहाय आणि विभागनिहाय समस्यांचा स्वतंत्र अभ्यास करण्याबरोबरच संघ लोकसेवा आयोग आणि इतर राज्यांतील भरती प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. संबंधित विभागांच्या सचिवांशी चर्चा करून समस्यांच्या मूळ कारणांचा शोध घेतला जाईल. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सूचना आणि प्रत्यक्ष संवादाच्या आधारे भरती परीक्षा प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या जातील.(Recruitment Exam Reform)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >