Tuesday, September 29, 2026

Drishyam 3 : दृश्यम 3 पाहा अन् फ्री पावभाजी खा! पण ‘ही’ अट लक्षात ठेवा

Drishyam 3 : दृश्यम 3 पाहा अन् फ्री पावभाजी खा! पण ‘ही’ अट लक्षात ठेवा

मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या  (Ajay Devgan) बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘Drishyam: The Conclusion’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. आता निर्मात्यांकडून चाहत्यांसाठी खास प्रमोशनल ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ‘दृश्यम 3’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या काही प्रेक्षकांना चक्क मोफत पावभाजी मिळणार आहे.

चित्रपटात पावभाजीचे विशेष महत्त्व

‘दृश्यम’च्या कथेत 2 ऑक्टोबर या तारखेला विशेष महत्त्व आहे. विजय साळगावकरने आपल्या कुटुंबासोबत 2 ऑक्टोबरला पणजीमध्ये असल्याचं दाखवण्यासाठी तयार केलेल्या कथेमध्ये पावभाजीचाही महत्त्वाचा उल्लेख आहे. आता चित्रपटातील हाच संदर्भ प्रमोशनमध्ये वापरण्यात आला आहे.

फ्रीमध्ये पावभाजी खाण्यासाठी ही अट लक्ष्यात ठेवा

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रेक्षकांना एक अट पूर्ण करावी लागणार आहे. ‘Drishyam: The Conclusion’ची किमान 4 तिकिटे एकाच व्यवहारात बुक करावी लागतील. ही बुकिंग PVR INOXच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवरून करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये 4 तिकिटे बुक केल्यास या ऑफरचा लाभ मिळणार नाही.

फक्त 'याच' ग्राहकांना लाभ मिळणार

या पद्धतीने तिकिटे बुक करणाऱ्या पहिल्या 500 पात्र ग्राहकांना मोफत पावभाजीचं कूपन दिलं जाणार आहे. मात्र ही ऑफर देशभरातील सर्व PVR INOX थिएटरमध्ये उपलब्ध असणार नाही.

2 ऑक्टोबर रोजी मुंबई, दिल्ली-NCR आणि गुरुग्राममधील निवडक PVR INOX सिनेमागृहांमध्ये या कूपनचा वापर करता येणार आहे. त्यामुळे तिकीट बुक करण्यापूर्वी संबंधित थिएटरमध्ये ऑफर लागू आहे की नाही, हे तपासणं आवश्यक आहे.

‘दृश्यम’च्या पहिल्या भागातील विजय साळगावकरची 2 ऑक्टोबरची कथा आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. सत्संग, पावभाजी आणि त्यानंतर कुटुंबासोबत परतण्याची कथा त्याच्या अलिबीचा महत्त्वाचा भाग ठरते. त्यामुळे चित्रपटातील पावभाजीचा संदर्भ आता प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

म्हणजेच ‘दृश्यम 3’चा शो, 2 ऑक्टोबर आणि प्लेटमध्ये पावभाजी, हे समीकरण चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. मात्र मोफत पावभाजीसाठी 4 किंवा त्याहून अधिक तिकिटे एकाच व्यवहारात बुक करणं आणि पहिल्या 500 पात्र ग्राहकांमध्ये नाव असणं आवश्यक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >