Wednesday, September 30, 2026

BMC News : जीएमएलआर प्रकल्प कामांसाठी फिल्मसिटीला मोजणार २० कोटी रुपये

BMC News : जीएमएलआर प्रकल्प कामांसाठी फिल्मसिटीला मोजणार २० कोटी रुपये

जमिनीचा तात्पुरता वापरासाठी भाडे आणि नुकसान भरपाईची केली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव चित्रनगरी (फिल्मसिटी)ते खिंडीपाडा (अमर नगर) मुलुंड दरम्यान दुहेरी बोगद्यांचे तसेच चित्रनगरी येथे पेटी बोगद्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या प्रकल्पाचे काम सुरु असल्याने चित्रनगरी महामंडळाने जागेच्या वापराबाबतचे भाडे आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यासाठी तब्बल २० कोटी रुपयांची मागणी फिल्मसिटीने केली आहे.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) हा मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० कि.मी. लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. विकास आराखडा २०३४ नुसार या रस्त्याची रुंदी ४५.७० मीटर असून, सदर प्रकल्पाची अंमलबजावणी चार टप्प्यांमध्ये करण्यात येत आहे. गोरेगाव (पूर्व) येथील चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर या दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उ‌द्यानाच्या खालून अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येकी तीन मार्गिकांचे, ५.३० कि.मी. लांबीचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पामध्ये दुहेरी बोगद्यांना जोडणारे १७ क्रॉस पॅसेज, ७२० मीटर लांबीचे दुहेरी पेटी बोगदे , गोरेगाव व मुलुंड येथे ६०० मीटर लांबीचे पोहोच रस्ते यांचा समावेश असून एकूण प्रकल्पाची लांबी ६.६२ कि.मी. आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पामुळे पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गाची थेट जोडणी होऊन पूर्व व पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी होईल तसेच प्रवासाचा कालावधी सुमारे ९० मिनिटांवरून २० मिनिटांपर्यंत कमी होऊन नागरिकांच्या वेळेची व इंधनाची मोठी बचत होणार आहे.

या प्रकल्प कामासाठी जे. कुमार-एनसीसी प्रा. लि या कंपनीची निवड करण्यात आली असून या प्रकल्पाचे सुमारे २१ टक्के भौतिक काम झाली आहे. टीबीएम १ ‌द्वारे बोगदा खोदकामाचे काम हे १७ ऑगस्ट २०२६ रोजी सुरु करण्यात आले असून टीबीएम२ ‌द्वारे बोगदा खोदकामाचे काम ऑक्टोबर २०२६ मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे.

या प्रकल्पामुळे चित्रनगरीतील अनेक चित्रीकरण मैदाने प्रभावित झाली असून, त्यातून चित्रनगरीचे आर्थिक नुकसान झाल्याबाबत चित्रनगरी महामंडळाकडून मुंबई महानगरपालिकेस पत्रव्यवहार प्राप्त झाला आहे. तसेच, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत फिल्म सिटीकडून जोश मैदान, जोकर मैदान इत्यादी मैदाने भाडेतत्वावर तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आली आहेत.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने, ४५.७० मीटर रुंदीच्या रस्तारेषेला समांतर असा १,६०० मीटर लांबीचा व १० मीटर रुंदीचा अतिरिक्त जमिनीचा पट्टा कार्यक्षेत्र म्हणून चित्रनगरीमार्फत हस्तांतरित करण्यात आला आहे. तसेच, जोश मैदान व जोकर मैदान या मैदानांचा उपयोग बोगदा खनन संयंत्रांचे सुटे भाग साठविण्यासाठी तसेच बोगदा खोदकामातून निर्माण होणारा गाळ तात्पुरत्या स्वरुपात साठविण्यासाठी करण्यात येत आहे.

चित्रनगरी महामंडळामार्फत मुंबई महानगरपालिकेकडे गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे चित्रनगरीतील चित्रीकरणाअभावी प्रभावित झालेल्या मैदानांच्या आर्थिक नुकसानीपोटी तसेच तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या जमिनीच्या भुईभाड्यापोटी एकूण १७४.१२ कोटी रक्कम अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यानुसार या कामात चित्रीकरणाअभावी प्रभावित झालेल्या मैदानांच्या आर्थिक नुकसानीपोटी तसेच भाडेतत्वावर बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रदान केलेल्या मैदानांचे भुईभाडे यासाठी एकूण २० कोटी ०८ लाख ३०हजार ६७७ रुपये एवढी रक्कम जमीन वापराचा तात्पुरता कालावधी ३१मार्च २०२९ पर्यंत विचारात घेऊन देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा