Wednesday, September 30, 2026

Asian Games 2026 : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! महिला तीरंदाजी संघ अन् नीरू-कीननचे सुवर्णपदक; PM मोदींकडून कौतुक!

Asian Games 2026 : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! महिला तीरंदाजी संघ अन् नीरू-कीननचे सुवर्णपदक; PM मोदींकडून कौतुक!

नवी दिल्ली : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई खेळ २०२६ (Asian Games 2026) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विजयाची मालिका कायम ठेवत देशासाठी ऐतिहासिक सुवर्णपदकांची कमाई केली आहे. ट्रॅप नेमबाजी (Trap Shooting) प्रकारात नीरू धांडा आणि कीनन चेनाई या जोडीने, तर महिलांच्या कंपाऊंड तीरंदाजी (Compound Archery) संघाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या दोन्ही ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

तीरंदाजीत चीनचा पराभव करत जागतिक विक्रमाची बरोबरी

महिलांच्या कंपाऊंड तीरंदाजीच्या अंतिम सामन्यात ज्योती सुरेखा वेन्नम, प्रथिका प्रदीप आणि चिकिथा तनिपार्थी यांच्या भारतीय त्रिकूटाने चीनच्या संघाला २३८-२३४ अशा फरकाने नमवत सुवर्णपदक पटकावले. या विजयादरम्यान भारतीय महिला संघाने २०१४ मध्ये दक्षिण कोरियाने नोंदवलेल्या २३८ गुणांच्या जागतिक विक्रमाची (World Record) बरोबरी केली. पंतप्रधानांनी या यशाचे कौतुक करताना सोशल मीडियावर लिहिले की, "जागतिक विक्रमाची बरोबरी करत मिळवलेले हे सुवर्णपदक अत्यंत खास आहे. आपल्या तीरंदाजांचे हे यश थक्क करणारे असून आगामी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा."

मिश्र ट्रॅप नेमबाजीत भारताचे पहिलेवहिले ऐतिहासिक सुवर्ण

 नेमबाजीत नीरू धांडा आणि कीनन चेनाई या जोडीने मिश्र ट्रॅप सांघिक प्रकारात (Trap Mixed Team Event) सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आशियाई खेळांच्या इतिहासात या प्रकारात भारताला मिळालेले हे पहिलेच सुवर्ण ठरले आहे. भारतीय जोडीने अंतिम फेरीत ३४ गुणांची कमाई करत ३० गुणांचा जुना आशियाई विक्रम मोडीत काढला आणि नवा विक्रम प्रस्थापित केला. यात कतारला रौप्य (३२ गुण) तर चीनला कांस्यपदक (२३ गुण) मिळाले. या कामगिरीवर पंतप्रधान म्हणाले, "नेमबाजी क्षेत्रासाठी हा एक अविस्मरणीय क्षण आहे. नीरू आणि कीननने आशियाई विक्रम करत भारताला हे सुवर्ण मिळवून दिले आहे. त्यांनी भविष्यातही अशीच चमक दाखवावी."

नीरू धांडाची स्पर्धेतील चमकदार कामगिरी

या स्पर्धेत भारतीय नेमबाज नीरू धांडाची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. तिने मंगळवारी वैयक्तिक महिला ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकून आशियाई खेळांमध्ये ही कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला बनण्याचा मान मिळवला होता. त्याशिवाय, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या साथीने महिला ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्यपदकही पटकावले होते. नीरूच्या या चौफेर कामगिरीमुळे चालू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >