Thursday, October 1, 2026

Nushrratt Bharuccha: अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात; रुग्णालयात उपचार सुरु

Nushrratt Bharuccha: अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात; रुग्णालयात उपचार सुरु

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बाली येथे कामाच्या निमित्ताने गेली असता तिचा अपघात झाला आणि तिला दुखापत झाली. सध्या नुसरतवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु, तिच्या दुखापतीचे स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर नुसरतने बाली येथील आपला मुक्काम वाढवला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यातच नुसरतने बाली येथील आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. 'Holiday on my mind! Where do I head out to now? ' असे कॅप्शन देऊन तिने आपल्या मेमरीज चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या. आता तिच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान अभिनेता टायगर श्रॉफसोबत नुसरत आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुसरत आणि टायगर श्रॉफ यांची जोडी पहिल्यांदा पडद्यावर झळकणार आहे. तिची भूमिका चित्रपटाच्या कथानकासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे, मात्र अधिक तपशील अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहेत.

कोण आहे नुसरत भरुचा?

२००२ मध्ये 'किट्टी पार्टी' या टीव्ही शोमधून आपल्या करियरची सुरुवात करणाऱ्या नुसरतने आपल्या भूमिकांमधून आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. २०११ मध्ये प्रसारित झालेल्या 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली असली तरी २००६ मध्ये 'जय संतोषी माँ' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमधील तिचा पहिला डेब्यू दिला. २०१८ मध्ये आलेला 'सोनू के टिट्टू की स्विटी' हा तिच्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट ठरला. तसेच 'ड्रीम गर्ल', 'छलांग' या चित्रपटातील नुसरातच्या भूमिका देखील गाजल्या. याव्यतिरिक्त तिने 'छोरी', 'अकेली', 'जनहित में जारी', 'राम सेतू' या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

यापूर्वी देखील नुसरत किरकोळ अपघातांना सामोरी गेली आहे. २०२३ मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान  नुसरत संगमरवरी फरशीवरून पडली होती तर त्याच वर्षी 'छोरी २' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून टाके पडले होते. याआधी २०२१ मध्ये नुसरतची तब्येत बिघडली होती. तिचा ब्लड प्रेशर लो झाला होता आणि डॉक्टरांनी याला वर्टिगो अटैक असल्याचे सांगितले होते. नुसरत सोबत घडत असलेल्या या घटनांमागे तिचं मंदिरात जाणं आणि हिंदू देवतांची पूजा करणं हे कारण असल्याचा दावा ऑल इंडिया मुस्लिम जातीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी केला होता. यानंतर त्यांनी तिला माफी मागण्याचा आणि कलमा वाचण्याचा सल्ला दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >