Thursday, October 1, 2026

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला; आज कुठे पावसाची शक्यता? जाणून घ्या हवामान अपडेट

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला; आज कुठे पावसाची शक्यता? जाणून घ्या हवामान अपडेट

 Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीच्या मान्सूनला सुरुवात झाली असून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. 1 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी पावसाचा मोठा अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन बाहेर पडावे.

कोकणात 30 सप्टेंबर रोजी काही भागांत पावसाने हजेरी लावली होती. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, आज मुंबईसह कोकणातील कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट नाही. तरीही काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पुढील काही दिवसही अशाच प्रकारचे हवामान राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये मात्र ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडू शकतात. नाशिकमध्ये कमाल तापमान 32 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. या भागांसाठी आज कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. मात्र, पुणे, सोलापूरसह काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्याचे कमाल तापमान सुमारे 31 अंश राहू शकते.

मराठवाड्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. सकाळच्या वेळी काही भागांत ढगाळ वातावरण राहू शकते, तर दुपारनंतर उन्हाचा कडाका जाणवण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 ते 34 अंशांदरम्यान राहू शकते. छत्रपती संभाजीनगरसह कोणत्याही जिल्ह्याला आज महत्त्वाचा अलर्ट नाही.

विदर्भात सध्या हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी आकाश निरभ्र राहणार असून पावसाची शक्यता कमी आहे. कमाल तापमान 33 अंशांच्या आसपास राहू शकते.

एकूणच, परतीचा मान्सून सुरू झाल्याने राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होत आहे. सप्टेंबरमध्येही अनेक भागांत अपेक्षेइतका पाऊस न झाल्याने शेतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाची स्थिती कशी राहते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >