Asian Games 2026 : कुस्तीत सुजीत कलकलचा ऐतिहासिक पराक्रम! २-९ ने मागे असताना मारली बाजी; भारताला मिळवून दिले 'सुवर्ण'

आयची-नागोया : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताचा युवा मल्ल सुजीत कलकल (Sujit Kalkal) याने इतिहास रचला आहे. शुक्रवारी झालेल्या पुरुषांच्या ६५ किलो फ्री-स्टाईल कुस्तीच्या अंतिम सामन्यात सुजीतने ताजिकिस्तानच्या अब्दुलमजिद कुदीवचा थरारक पराभव करत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले.



११ सेकंद शिल्लक असताना पलटवला सामना


अंतिम सामन्यात एक वेळ अशी होती की, सामना संपायला अवघा १ मिनिट ४० सेकंदांचा वेळ बाकी होता आणि सुजीत २-९ असा तब्बल ७ गुणांनी मागे पडला होता. परंतु, हार न मानता सुजीतने एकामागून एक जबरदस्त 'टेकडाऊन' दाव मारत सामन्याचे चित्रच पालटून टाकले. सामना संपायला अवघे ११ सेकंद शिल्लक असताना त्याने विजय खेचून आणला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. २०१८ च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी मिळवलेल्या सुवर्णपदकानंतर, कुस्तीतील भारताचे हे पहिलेच आशियाई सुवर्णपदक ठरले आहे.



पदकांची संख्या ७५ वर पोहोचली


सुजीतच्या या ऐतिहासिक विजयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारताची एकूण पदकसंख्या ७५ वर पोहोचली आहे. भारताच्या खात्यात सध्या १५ सुवर्ण, २५ रौप्य आणि ३५ कांस्य पदके जमा आहेत.



असा रंगला अंतिम थरार


सामन्याच्या सुरुवातीला ताजिकिस्तानच्या मल्लाने आक्रमक पकड घेत सुजीतला रिंगणाबाहेर ढकलून आणि पायास पकडून ४-० अशी आघाडी घेतली होती. सुजीतने २ गुण मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्या सत्रात प्रतिस्पर्ध्याने सुजीतचा तोल ढासळल्याचा फायदा घेत ९-२ अशी भक्कम आघाडी मिळवली. मात्र, शेवटच्या १ मिनिट २० सेकंदात सुजीतने सलग २-२ गुणांचे दाव मारत ही पिछाडी भरून काढली आणि अखेरच्या क्षणी ९-९ अशा स्थितीतून बाजी मारत सुवर्णपदक जिंकले.



ऑलिम्पिक विजेत्याला धूळ चारून गाठली होती अंतिम फेरी


अंतिम सामन्याआधीही सुजीतने अप्रतिम कामगिरी केली होती. उपांत्य फेरीत त्याने जपानच्या विद्यमान ऑलिम्पिक विजेत्या कियोकाला ३-३ अशा गुणांच्या बरोबरीत 'लास्ट पॉईंट' (अखेरचा गुण) नियमाच्या आधारे धूळ चारली होती. त्याआधी त्याने १६ च्या फेरीत अफगाणिस्तानच्या सय्यद उमर झझाईचा आणि उपांत्यपूर्व फेरीत इराणी मल्ल अब्बासचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.



रिंगणात भारतीय बॉक्सर्सची जादू : लवलीना, परवीन आणि अंकुशला सुवर्णपदक


बॉक्सिंगच्या रिंगणात भारतीय मुष्टियोद्ध्यांनी प्रतिस्पर्ध्यांची पुरती धुळधाण उडवली. भारताची स्टार बॉक्सर लवलीना बोर्गोहेन हिने आपल्या वाढदिवशी देशाला सुवर्णपदकाची खास भेट दिली. महिलांच्या ७५ किलो वजनी गटात तिने चीनच्या बाओ जियीचा तिन्ही फेऱ्यांमध्ये पराभव करत सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे, ६५ किलो वजनी गटात परवीन हिने चिनी तैपेईच्या चेन निएन-चिनचा पराभव करत सोन्यावर नाव कोरले. तर पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात अंकुश पंघाल याने कोरियाच्या किम मिनसियोंगला मात देत भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक टाकले.



तिरंदाजीत महिला रिकर्व्ह संघाचा ऐतिहासिक पराक्रम


यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारतीय तीरंदाजांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. महिलांच्या रिकर्व्ह संघ प्रकारात कुमकुम, कीर्ती आणि अंकिता या त्रिकुटाने अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या बलाढ्य संघाला धूळ चारत पहिल्यांदाच ऐतिहासिक सुवर्णपदकावर ताबा मिळवला. तर दुसरीकडे, रिकर्व्ह मिक्स टीम इव्हेंटमध्ये कुमकुम आणि धीरज यांच्या जोडीला अंतिम लढतीत चीनकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Comments
Add Comment

Asian Games 2026: भारताचा सुवर्ण दिवस, बॉक्सिंगमध्ये धडाधड गोल्ड मेडलची कमाई

एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरू असून भारतीय स्पर्धकांनी जबरदस्त झेप घेतली आहे. भारतासाठी स्पर्धेतील

Yuzvendra Chahal retirement: युझवेंद्र चहलची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

भारताचा स्टार लेग-स्पिनर युझवेंद्र चहल याने प्रथम श्रेणी (रेड-बॉल) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

India vs Pakistan Head to Head: भारताचा सलग सहा सामन्यात विजय, पाकिस्तानला अनेक वर्षांची प्रतीक्षा

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. एका वर्षाच्या कालावधीत हा

Asian Games 2026 : धीरज आणि कुमकुमने रचला इतिहास; मिश्रित रिकर्व्ह तिरंदाजीत भारताला प्रथमच रौप्यपदक!

नागोया (जपान) : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ 2026 मध्ये भारताच्या तिरंदाजांनी उत्कृष्ट

Asian Games 2026: टी20 क्रिकेट गोल्ड मेडलसाठी भारत पाकिस्तान भिडणार, कुठे आणि कधी सामना ते जाणून घ्या

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या पुरूष टी20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडणार आहेत.

World Cup ODI 2027: एकदा नाही तर दोन-तीनवेळा भारत पाकिस्तान सामना होणार, 10 ऑक्टोबरनंतर असे होतील सामना

भारत आणि पाकिस्तान हे संघ मल्टीनेशन स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यामुळे हे संघ आमनेसामने असले की