मिठी नदीतील गाळ उपसा आणि सफाईच्या कामातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) शुक्रवारी अटक केली. या प्रकरणाच्या तपासात मोरियाचे आर्थिक व्यवहार आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी केतन कदम याच्याशी असलेले आर्थिक संबंध तपास यंत्रणांच्या रडारवर आले होते. यापूर्वी ईओडब्ल्यूने मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांची चौकशी केली होती.
मिठी नदीतील गाळ उपशाच्या कामांमध्ये सुमारे ६५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूकडून तपास सुरू असून, विविध कंत्राटदार, मध्यस्थ तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तपासाच्या कक्षेत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान डिनो मोरिया आणि केतन कदम यांच्यातील आर्थिक व्यवहार समोर आले होते. २०१८ ते २०२२ या कालावधीत दोघांमध्ये झालेल्या संशयास्पद व्यवहारांची ईओडब्ल्यूकडून चौकशी करण्यात आली. या व्यवहारांची रक्कम सुमारे १४ ते १८ लाख रुपये असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते. मोरिया याच्या भावाशी संबंधित कंपनीच्या खात्यातही कदमकडून १८ लाख रुपये हस्तांतरित झाल्याचे तपासात आढळले होते. या व्यवहारांचे स्वरूप आणि त्यांचा मिठी नदी प्रकरणाशी संबंध तपासला जात आहे.
मिठी नदीच्या गाळ उपशासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध यंत्रसामग्री आणि कंत्राटी कामांवर मोठा खर्च केला होता. या कामांमध्ये कंत्राटदारांनी कथितरीत्या बनावट कागदपत्रे आणि वाढीव बिले सादर करून महापालिकेकडून निधी मिळवल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. काही कंत्राटदारांनी गाळ वाहतुकीबाबतही चुकीची माहिती दिल्याचे तपासात समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान ईओडब्ल्यूने डिनो मोरिया आणि सँटिनो मोरिया यांची अनेक तास चौकशी केली होती. आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि बँक खात्यांशी संबंधित माहितीही तपासण्यात आली. त्यानंतर आता डिनो मोरिया याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपासात या आर्थिक व्यवहारांचा आणि मिठी नदी प्रकल्पातील गैरव्यवहाराचा नेमका संबंध स्पष्ट होण्याची शक्यता आहे.






