Friday, October 2, 2026

Anil Kapoor: अनिल कपूरच्या ‘सुबेदार’चा परदेशातही डंका, प्रतिष्ठित नामांकनाने गौरव

Anil Kapoor: अनिल कपूरच्या ‘सुबेदार’चा परदेशातही डंका, प्रतिष्ठित नामांकनाने गौरव

मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाची आणि सदाबहार व्यक्तिमत्त्वाची चार दशके यशस्वीपणे पूर्ण करणारे मेगास्टार अनिल कपूर यांनी पुन्हा एकदा जागतिक पातळीवर भारताचा मान उंचावला आहे. दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांच्या आगामी बहुचर्चित 'सुबेदार' (Subedaar) या ॲक्शन-ड्रामा चित्रपटातील 'अर्जुन मौर्य' ही मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी अनिल कपूर यांना प्रतिष्ठित एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेता - प्रमुख भूमिकेतील' (Best Actor in a Leading Role) या अत्यंत मानाच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

'एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स' पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अनिल कपूर यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर आनंद व्यक्त केला आहे. हा क्षण आपल्या कारकिर्दीतील अत्यंत खास असल्याचे सांगत त्यांनी लिहिले की, " मला 'सुबेदार' चित्रपटासाठी प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी 'एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स' जाहीर झाल्याबद्दल धन्यवाद. भारताचे प्रतिनिधित्व करताना नामांकन मिळाल्याबद्दल मला आनंद आणि सन्मान वाटतो. या संपूर्ण चित्रपटाच्या टीमचे आणि या प्रवासात पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो."

यासोबतच त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांच्याप्रती विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे. "@sureshtriveni_ आपण हा चित्रपट बनवताना जो प्रवास एकत्र केला, त्यामुळे मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी आणखीनच खास बनला आहे," असेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांना देखील 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (फीचर फिल्म)' या श्रेणीत नामांकन मिळाले आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या टीमचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.

दिग्गज अभिनेत्याची विलक्षण कारकीर्द

'मिस्टर इंडिया', 'नायक' यांसारखे एकापेक्षा एक आयकॉनिक व्यावसायिक ब्लॉकबस्टर चित्रपट देण्यापासून ते ऑस्कर विजेत्या 'स्लमडॉग मिलियनेअर'मधील आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित अभिनयापर्यंत, अनिल कपूर यांचा अभिनय प्रवास नेहमीच थक्क करणारा राहिला आहे. आजवरच्या चार दशकांच्या कारkiर्दीत त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या पात्रांमध्ये प्राण फुंकत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

वय ही केवळ एक संख्या आहे हे सिद्ध करत आजही ते तितक्याच जोमाने आणि नव्या ऊर्जाने दर्जेदार भूमिका साकारत आहेत. 'सुबेदार'मधील अर्जुन मौर्य या भूमिकेसाठी मिळालेले हे आंतरराष्ट्रीय नामांकन त्यांच्या अष्टपैलू अभिनयाची आणि भारतीय सिनेमातील त्यांच्या अतूट स्थानाची पुन्हा एकदा साक्ष देणारे ठरले आहे. देशभरातून आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >