Nashik Crime : नाशिक तालुक्यातील आंगणगाव येथे दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) नाशिक युनिटने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयिताकडे आढळलेला स्फोटकांचा परवाना मुदतबाह्य असून तो दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके संशयितापर्यंत पोहोचली कशी, तसेच त्यांचा पुरवठा नेमका कोणी केला, याचा तपास एटीएसकडून सुरू आहे. स्फोटकांचा मुख्य पुरवठादार असलेल्या होलसेलरची चौकशी आता तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.
घरातून २६० जिलेटिन कांड्या, १,५०० डिटोनेटर्स जप्त
नाशिक एटीएसच्या पथकाला आंगणगाव परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणावर स्फोटके लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत संशयित नितीन गायकवाड याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत २६ बॉक्स जिलेटिन अर्थात सुमारे २६० जिलेटिन कांड्या आणि १,५०० डिटोनेटर्स जप्त करण्यात आले. निवासी वस्तीत आणि राहत्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. संशयित नितीन गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या स्फोटकांचा साठा नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला होता, याचा तपास सुरू आहे.
Nashik Road Central Jail : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. MD ड्रग्स प्रकरणात कारागृहात असलेल्या सनी ...
दगडखाणीसाठी स्फोटके आणल्याचा दावा
नितीन गायकवाड याचा स्टोन क्रशिंग आणि बांधकामाशी संबंधित व्यवसाय असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दगडखाणीतील सुरुंग लावणे आणि दगड फोडण्याच्या कामासाठी ही स्फोटके आणण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, स्फोटकांचा परवाना मुदतबाह्य असणे आणि तो दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असणे यामुळे तपास यंत्रणेकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.
स्फोटकांचा पुरवठा कोणी केला ?
परवान्याची मुदत संपल्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांची विक्री कशी झाली, हा महत्त्वाचा प्रश्न तपास यंत्रणेसमोर आहे. तसेच परवाना दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असताना स्फोटकांचा साठा संशयितापर्यंत कसा पोहोचला, याचाही तपास केला जात आहे. ही स्फोटके अधिकृत मार्गाने खरेदी करण्यात आली होती की बेकायदेशीर मार्गाने त्यांचा पुरवठा झाला, याचा शोध एटीएस घेत आहे. त्यासाठी स्फोटकांचा मुख्य पुरवठादार असलेल्या होलसेलरची चौकशी केली जाणार आहे.
काळाबाजाराचा संशय? एटीएसकडून विविध बाजूंनी तपास
स्फोटकांचा एवढा मोठा साठा निवासी ठिकाणी का ठेवण्यात आला होता, त्याचा वापर नेमका कुठे आणि कोणासाठी होणार होता, तसेच या प्रकरणामागे केवळ व्यावसायिक कारण आहे की बेकायदेशीर व्यवहाराचा काही संबंध आहे, या सर्व शक्यतांचा तपास एटीएसकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात कोणताही घातक कट असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जप्त केलेल्या स्फोटकांचा स्रोत, पुरवठ्याची साखळी आणि त्यांचा वापर याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. एटीएस नाशिक युनिट आणि येवला तालुका पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.