Nashik : आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम आणि कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाइनच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेकडून ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे नाशिकमार्गे मुंबईकडे आणि मुंबईहून उत्तर भारताच्या दिशेने धावणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. काही गाड्यांचे इगतपुरी येथे नियमन करण्यात येणार असून, काही गाड्यांना खर्डी आणि आटगाव येथे थांबवण्यात येणार आहे.
अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम
७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ या वेळेत, तर ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० या वेळेत कसारा परिसरात ब्लॉक असेल. त्यामुळे ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव-कसारा दरम्यानची उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाही. या ब्लॉकचा मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम होणार आहे. गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, अयोध्या कँट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, बलिया-दादर एक्स्प्रेस आणि ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस या गाड्यांचे इगतपुरी येथे नियमन करण्यात येणार आहे. तर दादर-गोरखपूर एक्स्प्रेसला खर्डी येथे एक तास, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-राजगीर एक्स्प्रेसला आटगाव येथे ३० मिनिटे थांबवण्यात येणार आहे.
Nashik Road Central Jail : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. MD ड्रग्स प्रकरणात कारागृहात असलेल्या सनी ...
भुसावळ विभागातही गाड्यांचे नियमन
भुसावळ विभागात काही गाड्यांचे ३० मिनिटांपासून ते १ तास २५ मिनिटांपर्यंत नियमन करण्यात येणार आहे. यामुळे साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत, कामायनी एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि कुशीनगर एक्स्प्रेससह अनेक गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. ८ ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या बनारस, पाटलिपुत्र आणि अमृतसर एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच ९ ऑक्टोबर रोजी सुटणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
तिसऱ्या मार्गिकेमुळे वाहतूक क्षमता वाढणार
मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय वाहतूक स्वतंत्रपणे हाताळणे शक्य होणार आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. पायाभूत सुविधांची देखभाल, सुरक्षितता आणि मार्गिकेच्या कामासाठी हा विशेष ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





