मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी संवेदनशीलपणे संपर्क ठेवावा आणि आवश्यक मदत करावी, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आळंदी येथील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या एका खासगी अकॅडमीचे विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे गेले होते. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थी खोल पाण्यात गेले. यामध्ये 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्यांचे वय 16 ते 17 वर्षे होते. (Diveagar Accident)
महाराष्ट्रात 8.57 लाख कोटींची गुंतवणूक; 2.91 लाख रोजगारांच्या संधी मुंबई : महाराष्ट्राला देशासह जागतिक स्तरावर गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या ...
या सहलीत एकूण 48 विद्यार्थी होते आणि त्यांच्या सोबत केवळ 2 शिक्षक होते. विद्यार्थ्यांना पोहता येते की नाही, याची माहिती घेणे आणि त्यांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखणे ही आयोजकांची जबाबदारी असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
समुद्रकिनारे, धरणे किंवा तलाव अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करताना त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. या प्रकरणात अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून चौकशी करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून तपासाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी खासगी क्लासेस, शाळा आणि इतर संस्थांसाठी सहलींबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संस्थेबाहेर सहलीसाठी घेऊन जाताना त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी संबंधित संस्थेवर राहील, यावर भर दिला जाणार आहे.