Nashik : पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पितृकर्म आणि धार्मिक विधींसाठी राज्यासह देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. वाढत्या गर्दीमुळे मंदिर परिसरातील दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
३ ते १२ ऑक्टोबरपर्यंत VIP दर्शन बंद
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सर्व प्रकारचे VIP दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत देवस्थान ट्रस्टकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र, केंद्र किंवा राज्य शासन तसेच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या राज्य शिष्टाचारासंबंधीच्या लेखी पत्रव्यवहारानुसार असलेल्या अपवादांना हा निर्णय लागू राहणार नाही, असे ट्रस्टने स्पष्ट केले आहे. वाढत्या गर्दीचे योग्य नियोजन करणे, सामान्य भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे आणि मंदिरातील दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे देवस्थान ट्रस्टने सांगितले आहे. भाविकांनी या निर्णयाची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकीय संघर्षाला अखेर विराम देत राज्याच्या पणन विभागाने संचालक मंडळ बरखास्त केले आहे. बाजार समितीच्या ...
त्र्यंबकेश्वरमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. भाविकांसह वाहनांची संख्या वाढल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्र्यंबकेश्वर बस स्थानक ते गजानन महाराज संस्थान या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पोलिसांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत आहे. पितृपक्षामुळे पुढील काही दिवसही त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता असल्याने दर्शन व्यवस्था आणि वाहतूक नियोजनाकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.






