Saturday, October 3, 2026

Maharashtra FDA raids : ठाणे-पालघरमध्ये FDA ची मोठी कारवाई; पान मसाला आणि तंबाखूसह 2.69 कोटींचा माल जप्त

Maharashtra FDA raids : ठाणे-पालघरमध्ये FDA ची मोठी कारवाई; पान मसाला आणि तंबाखूसह 2.69 कोटींचा माल जप्त

ठाणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत प्रतिबंधित पान मसाला, सुगंधी तंबाखू आणि इतर खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी करण्यात आलेल्या या कारवाईत प्रतिबंधित मालासह त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहनेही जप्त करण्यात आली. या तिन्ही कारवायांमध्ये जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 2 कोटी 69 लाख 29 हजार 860 रुपये आहे.

ठाणे झोन-10 मध्ये FDA अधिकाऱ्यांना प्रतिबंधित खाद्यपदार्थ घेऊन एक ट्रक जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार येवाई पूल परिसरात MH-18-BZ-4528 क्रमांकाचा आयशर ट्रक अडवण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये 55.08 लाख रुपये किमतीचे प्रीमियम राज निवास पान मसाल्याचे 27,540 पाकिटे आणि 26.43 लाख रुपये किमतीचे ZN-01 जाफरानी जर्द्याचे 27,540 पाकिटे आढळली. याशिवाय सुमारे 20 लाख रुपये किमतीचा ट्रकही जप्त करण्यात आला. या कारवाईची एकूण किंमत 1.01 कोटी रुपयांहून अधिक आहे.

पालघरच्या डहाणू तालुक्यातील चारोटी टोलनाक्यावरही FDA ने कारवाई केली. विक्रीसाठी प्रतिबंधित खाद्यपदार्थ घेऊन जाणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात आली. या प्रकरणात 43.5 लाख रुपये किमतीचा माल आणि सुमारे 20 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक जप्त करण्यात आला. या प्रकरणात वाहन चालकासह सात जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, ठाणे झोन-7 मध्येही प्रतिबंधित खाद्यपदार्थांच्या वाहतुकीविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत 84.28 लाख रुपये किमतीचा माल आणि 20 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे.

ठाणे आणि पालघरमधील या कारवायांनंतर प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर पुढेही कारवाई केली जाणार असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >