Sunday, October 4, 2026

Maatrubhumi Movie: सलमान खानच्या मोस्ट अवेटेड 'मातृभूमी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी; केंद्र सरकारकडून हिरवा कंदील

Maatrubhumi Movie: सलमान खानच्या मोस्ट अवेटेड 'मातृभूमी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी; केंद्र सरकारकडून हिरवा कंदील

नवी दिल्ली: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान लवकरच एका नव्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 2020 साली जून महिन्यात भारत- चीन सीमेवरील गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षाची कहानी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. 'बॅटल ऑफ गलवान'नावाने चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. पण आता या चित्रपटाचं नाव बदलून 'मातृभूमी' करण्यात आलं आहे. सलमान खानच्या 'मातृभूमी' चित्रपटाबद्दल महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. संरक्षण मंत्रालय आणि माहिती- प्रसारण मंत्रालयाने चित्रपटातील काही उल्लेखांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं होतं. पण आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाच्या अनेक सीन्सवर आक्षेप घेण्यात आला होता. सध्या भारत- चीनमधील संबंध सुधारत आहेत. दोन्हीही देशांमधील सुधारत असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील अनेक सीन्समध्ये बदल सुचवण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजसाठी विलंब झाला. आता माहिती- प्रसारण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाल्यानंतर निर्मात्यांकडून सलमान खानचा हा मोस्ट अवेटेड चित्रपट 13 नोव्हेंबर रोजी, प्रदर्शित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. अद्याप चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, भारत- चीन दरम्यानचे सुधारत असलेल्या राजनैतिक संबंधांमुळे, चित्रपटामध्ये दाखवलेला चीनचा उल्लेख आणि आशयावर संरक्षण मंत्रालयाला आक्षेप होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती- प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना अनेक बदल सुचवले होते. त्याप्रमाणे बदल केल्यानंतर चित्रपटाच्या कॉपीवर अधिकारी समाधानी आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यातच चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना ना हरकत प्रमाणपत्र (NOC) सादर केलेली आहे. अद्याप निर्मात्यांकडून चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानकडून 13 नोव्हेंबर या तारखेचा विचार केला जात आहे. सलमान खानच्या मते, दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना देशभक्तीपर चित्रपटाचे रिलीज उत्तम असेल. निर्मात्यांच्या आणि सलमान खानच्या म्हणण्याप्रमाणे जर सर्व काही व्यवस्थित झालं तर, येत्या काही दिवसांमध्ये चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली जाऊ शकते. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC)च्या मंजुरीसाठी लवकरच निर्मात्यांकडून चित्रपट पाठवण्यात येणार आहे. केंद्रीय चित्रपट बोर्डाकडून चित्रपटाला मंजुरी मिळाल्यानंतर चित्रपट निर्मात्यांकडून चित्रपटाची रिलीज डेट ठरवली जाईल.

दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लखिया यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती सलमान खानने स्वत: केली आहे. सलमान खान फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. सलमान खान आणि चित्रंगदा सिंह प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >