स्टार प्रवाह वाहिनीवरील नावाजलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. गेले ११ महिने अनेक नाट्यमय वळणांमुळे, मालिकेतील कथानकांमुळे लोकप्रिय झालेली 'वचन दिले तू मला' ही मालिका आपले २८० एपिसोड्स पूर्ण करून प्रेक्षकांचा निरोप घेतेय. यासंदर्भात मालिकेतील कलाकार मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या मालिकेची शूटिंग संपली असून ११ ऑक्टोबरला मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होईल.
मालिकेच्या आठवणी मांडताना खलनायकाच्या भूमिकेत असलेले मिलिंद गवळी भावुक झाले. २ ऑक्टोबरला शूटिंगचा शेवटचा दिवस होता, "वचन दिले तू मला" या मालिकेचा प्रवास त्या रात्री आम्हा कलाकारांसाठी संपला, असं ते पोस्टमध्ये म्हणाले. त्यांनी पुढे हर्षवर्धन जहागीरदार ही भूमिका साकारताना असलेल्या आठवणी शेअर केल्या. 'जवळजवळ ११ महिन्याचा हा आमच्या मालिकेचा प्रवास, फारच भारी होता. स्टारप्रवाह आणि सेवेन्थ सेन्स मीडिया ने बनवलेली हीमालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. वकिलांचं घराणं असलेल्या जहागीरदार कुटुंबाची ही आगळीवेगळी कथा होती. याच कुटुंबातला मी हर्षवर्धन जहागीरदार एका निष्णात वकिलाचं character गेल्या ११ महिने जगत होतो, या वर्षभरात मला खूप काही शिकायला मिळालं, भारतीय संविधान, फौजदारी कायदा (गुन्हे, शिक्षा), दिवाणी प्रक्रिया (CPC),करार कायदा, मालमत्ता कायदा, कुटुंब कायदा,कंपनी कायदा, कामगार कायदा, पुरावा कायदा IPC ते BNS? CrPC (फौजदारी प्रक्रिया संहिता) होतं, आता BNSS (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता),Evidence Act (पुरावा कायदा) → BSA (भारतीय साक्ष्य अधिनियम).'
पुढे त्यांनी आपण ग्रॅज्युएशन नंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं, मग सोडून दिलं होतं, पण आपल्या नशिबात कायद्याचा अभ्यास होताच आणि तो या मालिकेच्या निमित्ताने झाला, असे सांगितले. पुढे त्यांनी टीमचे आभार मानले. एका छान मालिकेचा छान प्रवास प्रेक्षकांच्या हृदयात घर करून संपला.तसेच ही भूमिका निभावताना खूप शिकायला मिळालं, आनंद झाल्याचं देखील त्यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केलं.
'वचन दिले तू मला' ही मालिका १५ डिसेंबर २०२५ रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाह वर सुरू झाली, १६ फेब्रुवारी पासून रात्री १०वाजता प्रसारित व्हायला लागली, मग २७ एप्रिल पासून संध्याकाळी ६.३० वाजता, १० ऑगस्ट असून दुपारी १ वाजता आणि ११ ऑक्टोबरला मालिका संपणार आहे. या मालिकेत नायिका अनुष्का सरकटे आणि नायक इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत होते. ऊर्जा आणि शौर्यच्या या जोडीने घराघरांत राज्य केलं. तसंच मिलिंद गवळी यांच्या खलनायकाच्या भूमिकेनेही मालिका गाजवली. त्यासोबतच शौर्यवर प्रेम करणारी त्याची आजी, उर्जाची खडूस, स्वार्थी बहीण या सहकलाकारांनी देखील मालिकेत रंग भरला.