Monday, October 5, 2026

Indigo Flight : ऐन सणासुदीत विमान प्रवास महागणार; इंडिगोने इंधन शुल्कात केली मोठी वाढ

Indigo Flight : ऐन सणासुदीत विमान प्रवास महागणार; इंडिगोने इंधन शुल्कात केली मोठी वाढ

मुंबई : सणासुदीच्या काळात विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात आता वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटांवरील इंधन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर 6 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्रीपासून होणाऱ्या नवीन बुकिंगसाठी लागू होणार आहेत. (Indigo Flight)

गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत मोठी वाढ झाली आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे इंधनाच्या दरावर परिणाम झाला असून विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या एटीएफच्या किमतीतही वाढ झाली आहे. वाढलेल्या इंधन खर्चाचा परिणाम विमान कंपन्यांच्या खर्चावर होत असल्याने इंडिगोने इंधन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाणून घ्या नेमके किती दर वाढ केली आहे?

देशांतर्गत उड्डाणांसाठी अंतरानुसार इंधन शुल्क आकारले जाणार आहे. 500 किमीपर्यंतच्या प्रवासासाठी 375 रुपये, 1,000 किमीपर्यंत 600 रुपये, 1,001 ते 1,500 किमीपर्यंत 900 रुपये, 2,000 किमीपर्यंत 1,150 रुपये आणि 2,000 किमीपेक्षा जास्त अंतरासाठी 1,300 रुपये शुल्क असेल. आंतरराष्ट्रीय मार्गांवर SAARC देशांसाठी 500 किमीपर्यंत 1,000 रुपये आणि त्यापेक्षा जास्त अंतरासाठी 3,000 रुपये शुल्क आकारले जाईल. तर आग्नेय आशिया, आखाती देश, मध्य पूर्व, उत्तर व पूर्व आशियासाठी 5,500 रुपये, आफ्रिकेसाठी 6,000 रुपये आणि युरोपसाठी 10,000 रुपये इंधन शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांवर मोठा आर्थिक भार पडू नये यासाठी शुल्कवाढ मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

दर वाढल्याने प्रवाशी चिंतेत

सणासुदीच्या काळात विमान तिकिटांच्या किमतीत वाढ झाल्याने प्रवाशांच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही प्रवासी विमानाऐवजी रेल्वे किंवा इतर प्रवासाच्या पर्यायांचा विचार करू शकतात.

इंडिगोने दरा का वाढवले?

एटीएफच्या वाढत्या किमतीमुळे विमान कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे इंडिगोने इंधन शुल्कात बदल केला असून, प्रवाशांवर कमीत कमी अतिरिक्त भार पडेल याची काळजी घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. बदलत्या बाजारपेठेवर लक्ष ठेवून गरजेनुसार भविष्यात शुल्कात पुन्हा बदल केला जाऊ शकतो, असेही इंडिगोने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >