Sunday, October 4, 2026

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मोठं यश; साबरमती नदीवरील 12 मजली उंचीचा पूल तयार

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मोठं यश; साबरमती नदीवरील 12 मजली उंचीचा पूल तयार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अहमदाबादमधील साबरमती नदीवर बुलेट ट्रेनसाठी उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नदीपात्रापासून सुमारे 36 मीटर म्हणजेच 118 फूट उंच असलेला हा पूल जवळपास 12 मजली इमारतीइतका उंच आहे.

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरचा हा पूल सुमारे 480 मीटर लांब आहे. साबरमती आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान हा पूल महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. साबरमती बुलेट ट्रेन स्थानकापासून तो सुमारे 1 किलोमीटर, तर अहमदाबाद स्थानकापासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर आहे. हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-दिल्ली मुख्य रेल्वे मार्गाला समांतर आहे.

बुलेट ट्रेनचा वेग

बुलेट ट्रेनचा वेग ताशी 320 किलोमीटरपर्यंत असणार आहे. या 508 किलोमीटर लांबीच्या मार्गावर अनेक मोठे पूल उभारले जात आहेत. साबरमती नदीवरील पुलाला मजबूत आधार देण्यासाठी 6 ते 6.5 मीटर व्यासाचे 8 गोलाकार खांब उभारण्यात आले आहेत. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये यासाठी खांबांची ठिकाणे काळजीपूर्वक निश्चित करण्यात आली.

या पुलाच्या बांधकामासाठी संतुलित कॅन्टिलीव्हर पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रामुळे नदीत तात्पुरते आधार न उभारता पुलाचा भाग टप्प्याटप्प्याने तयार करणे शक्य झाले. पुलाचा पाया आणि अंतर्गत रचनांचे काम पूर्ण झाले असून 76 मीटर लांबीचे 3 गाळे तयार करण्यात आले आहेत.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात गुजरातमध्ये 21, तर महाराष्ट्रात 4 नदी पूल आहेत. पालघरमधील वैतरणा नदीवरील पूल सुमारे 2.3 किलोमीटर लांब असून तो या मार्गावरील सर्वात लांब नदी पूल आहे. गुजरातमधील नर्मदा नदीवरील पूल 1.4 किलोमीटर लांब आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >