Monday, October 5, 2026

Nitesh Rane : आदित्य ठाकरे भारतात आहेत की देश सोडून गेले?

Nitesh Rane : आदित्य ठाकरे भारतात आहेत की देश सोडून गेले?

गर्जना मोर्चातील अनुपस्थितीवर मंत्री नितेश राणेंची टीका; पासपोर्ट जप्त करून लुकआऊट नोटीस काढण्याची मागणी

मुंबई : मुंबईत रविवारी झालेल्या ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना' मोर्चात आमदार आदित्य ठाकरे अनुपस्थित राहिल्याच्या मुद्द्यावरून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. दिशा सालियान प्रकरणातील एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव १३ वेळा घेतले आहे. तसेच डिनो मोरिया यांच्या अटकेनंतर तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. त्यामुळे अटकेच्या भीतीने देश सोडून जाणाऱ्या गुन्हेगारांप्रमाणे आदित्य ठाकरेही देश सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा राणे यांनी केला. आदित्य ठाकरे देशात आहेत की देश सोडून गेले आहेत, याची पोलिसांनी तपासणी करावी. त्यांचे घर तपासून ते मातोश्रीवर आहेत की देशाबाहेर गेले आहेत, हे पाहावे. अशा परिस्थितीत त्यांचा पासपोर्ट जप्त करून लुकआऊट नोटीस काढावी, अशी मागणी त्यांनी केली.

नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मंत्री राणे म्हणाले, आदित्य ठाकरे काल व्यासपीठावर दिसले नाहीत. आम्ही तापाचे कारण ऐकले; मात्र, माझा मुद्दा असा आहे की गंभीर आरोपांचा सामना करावा लागण्याच्या भीतीने ते देश सोडून जाऊ शकतात, असा दावा राणे यांनी केला. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर परवानगी नसल्याने गुन्हा दाखल झाल्याबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे; मात्र त्यासाठी कायदेशीर परवानगी आवश्यक आहे. परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास गुन्हे दाखल होणारच आणि त्याला सामोरे गेले पाहिजे. एवढे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ माजी मंत्री व्यासपीठावर असताना परवानगीशिवाय मोर्चा काढण्याचे परिणाम माहिती असायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.

मी मंत्री झाल्यास नितेश राणे भाजप सोडतील, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली होती, त्यावरही मंत्री राणे यांनी प्रतिक्रिया दिली. "भारतीय जनता पक्ष मी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. त्यामुळे रोहित पवारांनी माझ्याबद्दल इकडतिकडची भाषा करण्यापेक्षा त्यांना माहिती असलेली वेळ आणि तारीख सांगावी. उद्या ते सत्तेत आले आणि मंत्री झाले तर संबंधित अध्यक्षांना (एमपीएससी) हटविण्यासाठी कोणती प्रक्रिया असते, हे त्यांनाही समजेल आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने मदत करता येईल", असे प्रत्युत्तर मंत्री नितेश राणे यांनी दिले.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. १३ पैकी १२ मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या असून, उर्वरित मागणी संवैधानिक पदाशी संबंधित असल्याने ती पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद ठेवून प्रश्न सोडवण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण न करता त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे राणे यांनी म्हटले.

एमपीएससीच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी व्ही. राधा आणि रामस्वामी यांच्या अंतर्गत सक्षम समिती तयार करण्यात आली असून, समितीच्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता दूर करणारा तोडगा काढला जाईल. सचिवांची बदलीही करण्यात आली आहे. प्रत्येकाला आपले मत आणि सूचना मांडण्याचा अधिकार आहे; मात्र हा विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्याने राजकारण न करता विद्यार्थीहिताची भूमिका घ्यावी, असे आवाहन राणे यांनी केले.

अभिजित दीपके मुखवटा, त्याच्या मागे उमर खालिद

- एमपीएससी विद्यार्थ्यांना पुणे बंदचे आवाहन करणारे अभिजित दीपके यांच्यावरही राणे यांनी टीका केली. दीपके हा ‘मुखवटा’ असून, त्याच्या मागे उमर खालिद असल्याचा आरोप त्यांनी केला. जंतरमंतरवरील आंदोलनाच्या वेळी पाकिस्तानमधून सोशल मीडिया खाती चालवली जात होती. भारतात अराजकता निर्माण करण्याच्या पाकिस्तानच्या अजेंड्याचीच भाषा दीपके करत असल्याचा आरोप राणे यांनी केला. - राज ठाकरे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्याबाबतही राणे यांनी भाष्य केले. एसआयआर रद्द करण्याची आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका एकाच अजेंड्याचा भाग आहे. मतदारयादीतून अपात्र व्यक्तींची नावे वगळण्याला विरोध करण्याऐवजी त्याचे स्वागत केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी आदित्य ठाकरे यांच्या अनुपस्थितीचे स्पष्टीकरण द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न

- केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिल्याच्या मुद्द्यावरूनही राणे यांनी काँग्रेसवर टीका केली. देशातील महत्त्वाच्या घटनात्मक पदांवरील व्यक्तींची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या प्रमुखाविरोधात कारवाई केल्यास आयोगाची विश्वासार्हता कमी होईल आणि त्यामुळे ‘वोट जिहाद’ करणाऱ्यांना मोकळे मैदान मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. - पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायद्यानंतर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’विरोधात कायदा करण्याच्या भूमिकेबाबत विचारले असता राणे यांनी हिंदुत्ववादी सरकारांकडून अशा प्रकारच्या ‘जिहाद’ला विरोध केला जाईल, असे म्हटले. ‘ना लँड जिहाद, ना लव्ह जिहाद, ना हलाल जिहाद’ ही भूमिका घेत हिंदुत्ववादी सरकारे समान नागरी कायद्याच्या माध्यमातून आपली भूमिका अधिक मजबूत करतील, असे ते म्हणाले.

काँग्रेस आणि जिहादी संघटनांच्या भूमिकेत साम्य

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतही राणे यांनी प्रतिक्रिया दिली. दिग्विजय सिंह यांनी इस्लाम आणि कुराण याबाबतही बोलण्याचे धैर्य दाखवावे. सनातन हिंदू धर्मावरच टीका का केली जाते, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस आणि जिहादी संघटनांच्या भूमिकांमध्ये साम्य असल्याचा आरोप करत देशाला ‘गजवा-ए-हिंद’अंतर्गत इस्लामिक राष्ट्र बनविण्याच्या अजेंड्याला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा