Nashik Crime : मुलगी झाली आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून पैसे आणावेत, या कारणावरून विवाहितेचा सुरू झालेला शारीरिक आणि मानसिक छळ अखेर तिच्या हत्येपर्यंत पोहोचला. पत्नीला खोलीत डांबून बेदम मारहाण केल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत विहिरीत फेकून देत अपघाती मृत्यूचा बनाव रचणाऱ्या पतीला नाशिकच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. नाशिक येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या न्यायालयाने आरोपी पती भाऊसाहेब मधुकर ढिकले याला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याशिवाय पत्नीच्या छळप्रकरणी त्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. या प्रकरणातील इतर आरोपींनाही न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सासू ताराबाई मधुकर ढिकले आणि नणंद गीता संपत आहेर यांना सुनेचा छळ केल्याप्रकरणी प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी बनाव रचणाऱ्या अनिल निवृत्ती दळवी याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
लग्नानंतर सुरू झाला छळ
नाशिक तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, सय्यदपिंप्री येथील अश्विनी भाऊसाहेब ढिकले यांचा विवाह १७ एप्रिल २००८ रोजी भाऊसाहेब ढिकले याच्याशी झाला होता. लग्नानंतर अश्विनी यांनी मुलगी दिव्याला जन्म दिला. त्यानंतर मुलगी झाल्याच्या कारणावरून तसेच ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून पैसे आणावेत, अशी मागणी करत पती, सासू आणि नणंदेकडून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला.
खोलीत डांबून बेदम मारहाण
१ सप्टेंबर २०१८ रोजी कपाटाचे कुलूप तोडल्याच्या कारणावरून भाऊसाहेब संतप्त झाला. त्याने अश्विनी यांना खोलीत डांबून काठीने त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत अश्विनी बेशुद्ध पडल्या.यानंतर आरोपीने त्यांना उचलून शेतातील विहिरीत फेकून दिले. पाण्यात बुडाल्याने अश्विनी यांचा मृत्यू झाला.
Nashik : राज्याच्या अनेक भागांतून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू असतानाच नाशिकमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला आहे. शहरातील तापमानाने ...
विहिरीजवळ तांब्या ठेवून रचला अपघाताचा बनाव
हत्येनंतर आरोपींनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी वेगळाच बनाव रचला. अश्विनी विहिरीतून पाणी शेंदताना पाय घसरून विहिरीत पडल्याचे भासवण्यासाठी विहिरीच्या काठावर पाण्याचा तांब्या ठेवण्यात आला.मात्र, पोलिसांच्या तपासात आणि वैद्यकीय पुराव्यांमध्ये अश्विनी यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या. त्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून मारहाण करून हत्या करण्यात आल्याचे तपासातून समोर आले.
आईच्या हत्येची चिमुकली साक्षीदार
या खटल्यात अश्विनी यांची मुलगी दिव्या हिची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. स्वतःच्या आईला मारहाण होताना आणि त्यानंतर घडलेला प्रकार डोळ्यांनी पाहिलेल्या दिव्याने न्यायालयासमोर धाडसाने संपूर्ण घटना सांगितली.सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील आर. पी. गावित आणि भानुप्रिया पेटकर यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. दिव्याची प्रत्यक्षदर्शी साक्ष, डॉक्टरांनी सादर केलेले वैद्यकीय पुरावे आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले.या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने पती भाऊसाहेब ढिकले याच्यासह इतर आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
न्यायालयाचा अंतिम निकाल
- भाऊसाहेब मधुकर ढिकले: खुनासाठी जन्मठेप + १० हजार रुपये दंड; पत्नीच्या छळासाठी ३ वर्षे सक्तमजुरी + १ हजार रुपये दंड.
- ताराबाई मधुकर ढिकले: छळवणुकीसाठी ३ वर्षे सक्तमजुरी + १ हजार रुपये दंड.
- गीता संपत आहेर: छळवणुकीसाठी ३ वर्षे सक्तमजुरी + १ हजार रुपये दंड.
- अनिल निवृत्ती दळवी: पुरावा नष्ट केल्याप्रकरणी (कलम २०१) ३ वर्षे सक्तमजुरी + १ हजार रुपये दंड.