Monday, October 5, 2026

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्णय

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्णय

मुंबई : विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. महायुतीच्या जागावाटपात मराठवाडा पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला असून, त्यानुसार चव्हाण यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबरला होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी ७ ऑक्टोबरला, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबर आहे. दरम्यान, सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. २००८, २०१४ आणि २०२०च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला होता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पदवीधरांचे प्रश्न यापुढेही नेटाने मांडण्याची भूमिका चव्हाण यांनी व्यक्त केली. महायुतीच्या नेत्यांनी विश्वास टाकून पुन्हा संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानत हा विश्वास सार्थ ठरविण्याची ग्वाही दिली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून चव्हाण यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेनंतर झाला. यापूर्वी भाजपकडून या मतदारसंघासाठी इच्छुकांची नावे चर्चेत होती. मात्र, अखेर महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम राहिला आणि चव्हाण यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, महाविकास आघाडीत या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडूनही उमेदवाराच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुतीकडून चव्हाण यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आता विरोधकांकडून कोणाला रिंगणात उतरविले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >