Tuesday, October 6, 2026

Dhule : दुष्काळाच्या झळा ! चार एकर केळीची उभी बाग रोटाव्हेटरखाली, धुळे जिल्ह्यात शेतकऱ्याची हतबलता

Dhule : अपुऱ्या पावसामुळे धुळे जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या शेतीला बसत आहे. काही दिवसांपूर्वी चिंचवार येथील शेतकऱ्याने पपईच्या बागेवर रोटाव्हेटर फिरविल्याची घटना चर्चेत आली होती. आता शिरपूर तालुक्यातील अर्थे शिवारात एका शेतकऱ्याने चार एकरांतील उभी केळीची बाग रोटाव्हेटरने जमीनदोस्त केली आहे. दुष्काळामुळे शेतीची झालेली दुरवस्था आणि शेतकऱ्यांची वाढती हतबलता या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली आहे.

पाच लाखांची गुंतवणूक

अर्थे शिवारातील शेतकरी सत्यपाल पाटील यांनी चार एकर क्षेत्रात केळीची लागवड केली होती. या बागेसाठी त्यांनी सुमारे पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मेहनत आणि भांडवल पणाला लावत त्यांनी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा ठेवली होती. बागेतून किमान आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली. त्याचा थेट परिणाम केळीच्या बागेवर झाला. पाण्याअभावी बागेची वाढ खुंटली आणि अपेक्षित फलधारणाही झाली नाही. त्यामुळे उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नाची आशाच मावळली.

बाग वाचविण्यासाठी खर्च करणेही झाले अशक्य

बाग वाचवण्यासाठी आणखी पाणी, मजुरी आणि इतर खर्च करणे शेतकऱ्याला परवडणारे राहिले नाही. अखेर मोठ्या कष्टाने उभी केलेली केळीची बाग नष्ट करण्याचा निर्णय सत्यपाल पाटील यांनी घेतला. काही महिन्यांपूर्वी हिरवाईने नटलेली चार एकरांची बाग काही तासांत रोटाव्हेटरखाली जमीनदोस्त झाली. लाखो रुपये खर्च करून उभी केलेली बाग स्वतःच्या हाताने नष्ट करण्याची वेळ आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली.

पावसाअभावी खरीप पिकांनाही मोठा फटका

धुळे जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांसह फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. केळी, पपई, कापूस, सोयाबीन, मका यासह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा उसनवारी करून शेतीत मोठी गुंतवणूक केली. मात्र पावसाने साथ न दिल्याने उत्पादनाचे गणित कोलमडले आहे. वाढता उत्पादन खर्च, पाणीटंचाई आणि उत्पन्नाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पपईनंतर केळीची बागही रोटाव्हेटरखाली

चिंचवार येथील पपई बागेनंतर आता अर्थे शिवारातील केळीची बाग नष्ट करण्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे दुष्काळाची झळ केवळ पिकांनाच नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उत्पन्नाऐवजी कर्जाचा भार वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नैसर्गिक संकटामुळे महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज

या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकनुकसान भरपाई, कर्जसवलत, वीजबिलात दिलासा आणि सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. उभी पिके रोटाव्हेटरखाली घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असेल, तर ही परिस्थिती प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणे आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >