Tuesday, October 6, 2026

Nashik : डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणात डॉ. स्वाती चव्हाण यांना जामीन, 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

Nashik : नाशिक शहरातील बहुचर्चित डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणात महत्त्वाची कायदेशीर घडामोड समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. स्वाती चव्हाण यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एफआयआरनुसार, मृत डॉ. मनीषा नीलेश जेजूरकर या पेशाने डॉक्टर होत्या. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजूरकर (Dr. Nilesh Jejurkar) हे नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मानसोपचार विभागात कार्यरत आहेत. डॉ. नीलेश जेजूरकर यांचे डॉ. स्वाती चव्हाण यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा आरोप मृत मनीषा यांच्या कुटुंबीयांनी केला होता. या कथित संबंधांमुळे आणि त्रासामुळेच मनीषा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती.

फोन कॉल आणि अपमानाचा आरोप

तपासादरम्यान समोर आलेल्या कागदपत्रांनुसार, जानेवारी 2026 मध्ये डॉ. स्वाती चव्हाण यांनी मनीषा यांना फोन केला होता. या संभाषणात, "तुमचे पती तुम्हाला पसंत करत नाहीत" असे सांगत मनीषा यांचे कमी शिक्षण, बौद्धिक क्षमता आणि सावळा रंग यांसारख्या कारणांवरून हिणवल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर 5 मार्च 2026 रोजी लग्नातील ग्रुप फोटो काढण्यावरून मनीषा आणि त्यांच्या पतीत वाद झाला आणि 7 मार्च 2026 रोजी डॉ. मनीषा जेजुरकर यांनी टोकाचे पाऊल उचलले.

न्यायालयात बचाव पक्षाचा युक्तिवाद

एफआयआरनुसार, ५ मार्च २०२६ रोजी लग्नातील ग्रुप फोटो काढण्याच्या मुद्द्यावरून डॉ. मनीषा आणि त्यांचे पती यांच्यात वाद झाला होता. यानंतर ७ मार्च २०२६ रोजी डॉ. मनीषा जेजूरकर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणातील जामीन अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. डॉ. स्वाती चव्हाण यांच्यावतीने अॅड. अविनाश भिडे यांनी बाजू मांडली. संशयित आरोपीचा या गुन्ह्याशी थेट संबंध नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोप सहआरोपी पतीशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचेही बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितले.

५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद तसेच एफआयआरमधील कागदपत्रांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने डॉ. स्वाती चव्हाण यांचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला. न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू राहणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >