Tuesday, October 6, 2026

FDA Action: एफडीए प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, मुंबईमध्ये 94.45 लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त

एफडीएने मुंबईसह पुण्यामध्ये अन्नपदार्थांची भेसळ करणाऱ्या आरोपींवर धडक करवाई केली आहे. फळे रसायन टाकून पिकवणे, दुध भेसळ, प्रतिबंधित अन्न पदार्थांवर कारवाई केली आहे.

मुंबई: एपीएमसी तुर्भे फळ बाजारात इथेफॉनने कृत्रिमरीत्या पिकविलेल्या केळीवर अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत 67,814 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 67,814 रूपये किंमतीचा हा मुद्देमाल 1394 किलो इतका होता. एफडीआयचे अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, वाशीच्या एपीएमसी बाजारामध्ये फळे रसायन वापरून पिकवली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी धाड टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी रसायनाच्या आधारावर पिकवलेली वेगवेगळ्या प्रजातीची केळी सुद्धा जप्त केली आहे. एफडीए अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दूध भेसळीविरोधात पुणे विभागाने माळशिरस येथे धडक कारवाई करत आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. Detergent चा वापर करून भेसळयुक्त 16,730 लिटर दूध जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या दुधाची किंमत अंदाजे 6.69 लाख इतका असण्याची शक्यता आहे. शिवाय, जप्त केलेला सर्व साठा पोलिसांनी नष्ट करून टाकला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ही धडक कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान आढळलेल्या नमुन्यांमध्ये अधिकाऱ्यांना भेसळ केल्याचे आढळले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे. मुंबई आणि कोकण विभागात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध अन्न- औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. 94.45 लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा आणि 35 लाखांची वाहने जप्त करत तब्बल 1.29 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी तीन FIR दाखल करत पाच आरोपींना अटक केले आहे.

मुंबईतील धारावी, बांद्रा पश्चिमेतील खेरवाडी रोड आणि सांताक्रूझ पश्चिमेतील रिलायन्स मॉलजवळ पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. शिवाय, या जाळ्यामध्ये आणखीन कोण कोण लोकं आहेत, त्यांचाही शोध घेतला जात आहे. कोकण विभागात पालघर आणि वसई या दोन परिसरातही धडक कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा पोलिसांनी आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. मुंबई विभागातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स व बेकरी आस्थापनांवर अन्न- औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा, स्वच्छता, साठवणूक आणि दस्तऐवजीकरणातील त्रुटींमुळे 11 दुकानांवर कारवाई केली आहे. त्यापैकी 8 दुकानांचे परवाने निलंबित केले असून 3 आस्थापनांची नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील बोरिवली पश्चिम, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम, ताडदेव, बॉम्बे सेंट्रल, माझगाव, भायखळा आणि गिरगाव या परिसरामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. अन्नसुरक्षा, स्वच्छता, साठवणूक आणि दस्तऐवजीकरणातील त्रुटींमुळे ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >