मुंबई : मुंबईकरांसाठी आणि गानकोकिळा श्रेया घोषालच्या (Shreya Ghoshal) चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदवार्ता आहे. श्रेया घोषाल तिच्या बहुप्रतिक्षित 'द अनस्टॉपेबल टूर'अंतर्गत मुंबईत लाइव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज झाली आहे. मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या या ग्रँड कॉन्सर्टच्या तिकिटांचे दर आता अधिकृतपणे समोर आले असून, यामध्ये सर्वात महागड्या पासची किंमत तब्बल २०,००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
श्रेया घोशाल मुंबई कॉन्सर्ट : तारीख, ठिकाण आणि तिकिटांचे दर
श्रेया घोषालच्या 'द अनस्टॉपेबल टूर'च्या भारत दौऱ्यातील मुंबईतील शो २७ मार्च २०२७ रोजी पार पडणार आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील प्रसिद्ध 'जिओ वर्ल्ड गार्डन'मध्ये या भव्य संगीतमयी कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. या शोसाठीची सर्वसामान्यांसाठी तिकीट विक्री ६ ऑक्टोबरपासून दुपारी १ वाजता 'District' या प्लॅटफॉर्मवर सुरू झाली आहे.
स्टेजपासून असणारे अंतर आणि अनुभवानुसार तिकिटांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत:
- सिल्व्हर पास (Silver Pass) : ₹३,०००
- गोल्ड पास (Gold Pass) : ₹४,५००
- फॅनपिट (Fanpit): ₹८,००० (स्टेजच्या अगदी जवळून अनुभवण्यासाठी)
- प्लॅटिनम पास (Platinum) : ₹१०,०००
- सोलिटेअर पास (Solitaire Pass) : ₹२०,००० (हा मुंबईतील शोसाठीचा सर्वात महागडा आणि व्हीआयपी पास आहे)
काय आहे 'द अनस्टॉपेबल इंडिया टूर' ?
ऑस्ट्रेलिया, आशिया आणि उत्तर अमेरिका या देशांमध्ये यशस्वी शो केल्यानंतर श्रेया घोषाल आता भारतात १४ शहरांचा महादौरा करत आहे. मुंबईतील कॉन्सर्ट हा याच दौऱ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्रेयाने सोशल मीडियाद्वारे या भारत दौऱ्याची घोषणा करताना, "हे फक्त कॉन्सर्ट्स नसून संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जोडल्या गेलेल्या खास नात्याचा उत्सव आहे," अशा भावना व्यक्त केल्या होत्या.
१४ शहरांमधील संगीतमयी प्रवासाचे संपूर्ण वेळापत्रक
श्रेया घोषालच्या या भारत दौऱ्याची सुरुवात २२ नोव्हेंबर २०२६ रोजी बंगळुरूमधून होणार आहे. त्यानंतर १९ डिसेंबरला गुवाहाटी आणि २६ डिसेंबरला कोलकाता येथे शो होतील. २०२७ च्या सुरुवातीला हा प्रवास अधिक रंगतदार होईल. १६ जानेवारीला भुवनेश्वर, २३ जानेवारीला विशाखापट्टणम आणि ३० जानेवारीला जयपूरमध्ये तिचे शोज होतील. त्यानंतर १४ फेब्रुवारीला (व्हॅलेंटाईन डे) नवी दिल्ली, २० फेब्रुवारीला हैदराबाद आणि २७ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये मैफिली सजतील. मार्च महिन्यात श्रेया ७ मार्चला कोची, १३ मार्चला पुणे आणि २० मार्चला चेन्नईत परफॉर्म करेल. यानंतर २७ मार्च २०२७ रोजी बहुप्रतिक्षित मुंबई कॉन्सर्ट पार पडेल. अखेर ३ एप्रिल २०२७ रोजी इंदूरमध्ये या १४ शहरांच्या भव्य भारत दौऱ्याचा दिमाखदार समारोप होईल.