Wednesday, October 7, 2026

Thank You...! भारतीय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला, बीसीसीआयने केलं जाहीर

भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ अधिकृत्यारित्या संपल्याचं जाहीर झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत चर्चा रंगली होती. पण बीसीसीआयने स्पष्ट काहीच सांगितलं नव्हतं.अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

भारतीय पुरूष क्रिकेट संघाचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ अखेर संपुष्टात आला आहे. अजित आगरकर यांनी जुलै 2023 मध्ये निवड समिती अध्यक्षपद स्वीकारलं होतं. तेव्हापासून तीन वर्षे त्यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला. वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवला जाईल असं बोललं जात होतं.पण तसं काही झालं नाही. अजित आगरकर यांची या पदावरची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2026 ही होती. त्यामुळे त्यांच्याबाबत काय निर्णय याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. दुसरीकडे, प्रज्ञान ओझा यांच्याकडे काळजीवाहू म्हणून हे पद सोपण्यात आलं होतं. त्यामुळे अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला असं क्रीडाप्रेमींनी आधीच मनाशी पक्कं केलं होतं. आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कारण बीसीसीआयने अजित आगरकर यांना कार्यमुक्त केलं असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. तसेच त्यांच्या पदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून घेतले आहेत.

बीसीसीआयने पोस्टमध्ये म्हंटलं की...

बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट करून अजित आगरकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयने पोस्टमध्ये लिहिलं की, 'भारतीय क्रिकेटसाठी कार्यकाळ खरोखरच खास क्षणांनी गाजलेला आहे. तीन आयसीसी ट्रॉफी, दोन आशिया कप विजेतेपदे आणि सलग दोन आशियाई क्रीडा सुवर्णपदके, तसेच 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक अंतिम फेरीपर्यंतची मजल. धन्यवाद, श्री अजित आगरकर. पुरुष निवड समितीचे अध्यक्ष म्हणून तुमच्या वचनबद्धतेबद्दल, दृढनिश्चयाबद्दल आणि योगदानाबद्दल. तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.'

गौतम गंभीरने व्यक्त केल्या भावना

अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानेही पोस्ट लिहिली आहे. गौतम गंभीर म्हणाला की, 'प्रिय अजित भाई, तुमच्यासोबत काम करणे हा एक मोठा सन्मान आहे. तीन आयसीसी ट्रॉफी तुमच्या विश्वासाची साक्ष आहेत. संघ प्रथम आणि नेहमीच संघ प्रथम. मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की इतिहास तुमच्या बाबतीत अधिक उदार असेल. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद.' अजित आगरकर आणि गौतम गंभीर गेल्या दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेटसाठी एकत्र काम करत होते. गंभीर 4 जुलै 2023 रोजी अजित आगरकरसोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून रूजू झाला. यानंतर भारतीय संघाने 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप, 2026 टी20 वर्ल्डकप आणि एशियन गेम्स 2026 स्पर्धेचं सुवर्ण पदक पटकावलं.

अजित आगरकरच्या जागी कोण?

बीसीसीआयने 6 ऑक्टोबर 2026 रोजी पुरूष निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागवले आहे. यात खेळाडूने किमान 7 कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी सामने, किंवा 10 एकदिवसीय आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळले असावेत. असेच उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी क्रिकेटमधून निवृत्त होऊन किमान पाच वर्षे झालेली असावीत.बीसीसीआयच्या नियमांनुसार, क्रिकेट समितीवर एकूण पाच वर्षे काम केलेली कोणतीही व्यक्ती या पदासाठी पात्र असणार नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >