ग्रँट रोडवरील ब्रिटिशकालीन जुना पार्सल डेपो आणि करी रोड व लोअर परेल स्थानकांदरम्यानचा एक विस्मृतीला गेलेला भूखंड यांना आता नवसंजीवनी मिळणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाडयांसाठी अतिरिक्त कोचिंग, देखभाल आणि थांबण्याच्या सुविधा निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने पश्चिम रेल्वे या दोन भूखंडांना पुनरुज्जीवित करण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात लांब पल्ल्याच्या १० ते १५ गाड्यांची वाढ होण्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. यामुळे पश्चिम रेल्वेला रेकसाठी पार्किंगची अधिक जागा आणि देखभालीच्या सुविधाही मिळतील.
ग्रँट रोडवर सुमारे ०.९ हेक्टर जमिनीवर १८९० साली बांधलेल्या एका पार्सल डेपोचा पुनर्विकास केला जाईल. १९९० च्या सुरुवातीपर्यंत या जागी दोन टर्मिनसवरून मालाची ये जा व्हायची. सध्या ही जागा जीर्णावस्थेत आहे. खराब अवस्थेत असलेल्या दोन मजली कार्यालयांमध्ये अजूनही काही कर्मचारी कार्यरत आहेत. पश्चिम रेल्वेने आता त्या जागेवरील सध्याचे रेल्वेमार्ग आणि जीर्ण झालेल्या संरचना पाडून १० नवीन स्टेबलिंग लाईन्स बांधण्याची योजना आखली आहे. 'स्टेबलिंग लाइन' (stabling line) हा रेल्वेचा एक विशिष्ट मार्ग असतो, ज्याचा वापर गाड्या सेवेत नसताना त्या उभी करून ठेवण्यासाठी केला जातो.
मोदींच्या २५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीनिमित्ताने विशेष कार्यक्रम मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून २००१ मध्ये सुरू झालेल्या पंतप्रधान ...
या प्रकल्पामध्ये नवीन सिग्नलिंग, प्रकाशयोजना आणि ओव्हरहेड उपकरणांचा समावेश आहे. तसेच तळमजला अधिक सहा मजली इमारत प्रस्तावित आहे. करी रोड आणि लोअर परेल दरम्यान असाच एक उपक्रम नियोजित आहे, ज्यात मध्य रेल्वेच्या मालकीची जमीन पश्चिम रेल्वेकडे हस्तांतरित केली जाईल. दोन्ही स्थानकांवरून येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी अतिरिक्त पिट लाईन क्षमता निर्माण करण्यासाठी हे एकमेव व्यवहार्य ठिकाण आहे. कारण दादर येथे नवीन पिट लाईन्स साठी जागा नाही मुंबई सेंट्रलमध्ये विस्ताराला मर्यादित वाव आहे. या योजनेत ६०० मीटर लांबीच्या दोन 'पिट लाइन्स', सहा 'क्रॉसओव्हर्स', नवीन सिग्नल यंत्रणा, ओएचई (OHE - ओव्हरहेड उपकरणे) व प्रकाशयोजनेतील बदल, तसेच तळमजल्यासह तीन मजले असलेले देखभाल कार्यालय यांचा समावेश आहे.
दादर टर्मिनसवरून चालवल्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याच्या उद्देशाने, पश्चिम रेल्वे (WR) या ठिकाणी 'कोचिंग मेंटेनन्स' सुविधा विकसित करणार आहे. मुंबई सेंट्रलपासून सुमारे २ किमी आणि दादरपासून २.५ किमी अंतरावर असलेली ही सुविधा दोन्ही रेल्वे स्थानकांना आवश्यक त्या देखभाल-दुरुस्ती सेवा पुरवण्यास मदत करेल. तसेच, सध्या मुंबईतून लांब पल्ल्याच्या अतिरिक्त गाड्या सुरू करण्यामध्ये देखभाल-दुरुस्तीच्या पायाभूत सुविधांची जी कमतरता अडथळा ठरत आहे, ती दूर करण्यासही यामुळे मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.