Wednesday, October 7, 2026

PM Narendra Modi : "मी कोणत्याही महत्त्वाकांक्षेसाठी नाही, तर ध्येयासाठी जगतो"; सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षे पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक!

सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांचा प्रदीर्घ कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित 'विकसित भारत संकल्प सभे'त ते बोलत होते. आपल्यासाठी कार्य करणे ही केवळ जबाबदारी नसून देशसेवा आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : आपल्या आयुष्यात कधीही निवडणूक लढवण्याचा विचार केला नव्हता, कारण लहानपणापासून मिळालेले संस्कार आणि शिक्षण यांनी आपल्याला 'महत्त्वाकांक्षेसाठी नाही, तर ध्येयासाठी जगणारी व्यक्ती' बनवले आहे, असे भावूक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काढले. सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांचा प्रदीर्घ कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित 'विकसित भारत संकल्प सभे'त ते बोलत होते. आपल्यासाठी कार्य करणे ही केवळ जबाबदारी नसून देशसेवा आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

'विकसित भारत २०४७'साठी दिला नवा मंत्र

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आजचा दिवस हा केवळ जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा नाही, तर आपल्या संकल्पांमध्ये नवी ऊर्जा भरण्याचा दिवस आहे. भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी जनतेचा उत्साह आणि 'सबका प्रयास' अत्यंत गरजेचे आहेत." यावेळी त्यांनी उपस्थितांकडून "आम्ही हे करून दाखवू!" या संकल्पाचा पुनरुच्चार करून घेतला. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे, जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणे, आत्मनिर्भर भारत घडवणे, जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनणे, ऑलिंपिकचे आयोजन करणे आणि अंतराळ क्षेत्रात नवी झेप घेणे, हे सर्व संकल्प देश नक्कीच पूर्ण करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"माझा राजकीय प्रवास कार्यकर्त्याचा होता"

आपल्या २५ वर्षांच्या प्रशासकीय प्रवासावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "अनेक लोक या २५ वर्षांच्या अखंड सेवेला माझे मोठे यश मानतात. पण मी याकडे वैयक्तिक मोठेपण म्हणून पाहत नाही. २५ वर्षांपूर्वी, वयाच्या पन्नासाव्या वर्षी मी आदिवासी भागात आणि पर्वतीय प्रदेशात समाजकार्य करत होतो आणि भारतीय जनता पक्षात एक संघटक म्हणून कार्यरत होतो. निवडणूक लढवण्याचा माझा कोणताही विचार नव्हता आणि तसा स्वभावही नव्हता."

"माझ्यासाठी कर्म हीच ईश्वरसेवा"

राजकारणात येण्यामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता असे सांगत त्यांनी भगवद्गीतेतील 'कर्मण्येवाधिकारस्ते' या श्लोकाचा संदर्भ दिला. "मला मिळालेली प्रत्येक जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडली आहे. देशासाठी निष्काम कर्म करणे हेच माझ्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे. देशवासीयांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि मिळालेल्या संधींमुळेच मी आज अखंड सेवा करू शकत आहे," असे पंतप्रधान म्हणाले.

गुजरातच्या अनुभवातून शिकलो प्रशासनाचे धडे

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून झालेला प्रवास आठवत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जेव्हा मी गुजरातची सूत्रे हातात घेतली, तेव्हा माझ्याकडे सरकार चालवण्याचा किंवा प्रशासनाचा कोणताही अनुभव नव्हता. पण माझ्याकडे जनतेवर असलेला विश्वास आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिळालेला अनुभव हीच माझी खरी ताकद होती. 'गुजरातचा विकास हाच देशाचा विकास' या मंत्रावर चालत आम्ही अनेक आव्हानांवर मात केली." हे २५ वर्षे माझे वैयक्तिक यश नसून या काळात देश किती पुढे गेला, यावरून याचे मूल्यमापन झाले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >