Wednesday, October 7, 2026

चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादव यांना १३ ऑक्टोबरपर्यंत २ कोटी रुपये जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

‘भूल भुलैया’ मधला छोटा पंडित असो, ‘हंगामा’ मधला राजा असो किंवा ‘वेलकम’ मधला तो अतरंगी अभिनेता… राजपाल यादव यांनी गेली अनेक दशकं आपल्या विनोदाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावलं. पण प्रेक्षकांना हसवणाऱ्या या चेहऱ्यावर निराशेचे ढग आहेत.सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेता राजपाल यादवला, चेक बाउन्स प्रकरणात तक्रारदाराला देय असलेली २ कोटी रुपये रक्कम १३ ऑक्टोबरपर्यंत जमा करण्याचे निर्देश दिले. ही रक्कम भरल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या यादवच्या याचिकेवर विचार केला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

राजपाल यादव हे न्यायालयात हजर होते. त्यांनी १.१५ कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट आणला होता. उर्वरित ८५ लाख रुपये १३ ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या मालमत्तेच्या खरेदीदारामार्फत द्यायचे आहेत. मात्र खंडपीठाने राजपाल यादव यांच्या वर्तवणुकीवर देखील टीका केली असून त्यांच्या शिक्षेत वाढ होऊ शकते असे सांगितले आहे. यादव यांच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, अभिनेत्याने पैसे भरण्यासाठी रजिस्ट्रीकडे संपर्क साधला होता. पण आरटीजीएसला परवानगी नव्हती. त्यामुळे यादव यांनी १.१५ कोटींचा डिमांड ड्राफ्ट आणला होता. उर्वरित रक्कम मालमत्तेचा खरेदीदार न्यायालयात हजर असून व्यवहार पूर्ण झाल्यावर दिली जाईल, असे वकिलांनी सांगितले.

खंडपीठासोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेत यादव यांनी 'अता पता लापता' या चित्रपटामुळे २०० ते २५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. यावेळी 'तुमचे पैसेही तुमच्या चित्रपटाप्रमाणे अता पता लापता आहेत ' असे भारतीय सरन्यायाधीश गंमतीने म्हणाले. पुढे त्यांनी राजपाल यादव यांना चांगला चित्रपट बनवून लोकांचे मनोरंजन करण्याचा सल्ला दिला. तसेच पुन्हा एकदा गंमत करत सर्वोच्च न्यायालयासमोर हजर होणारे वकील हे उत्तम अभिनेते असून त्यांना त्याच्या चित्रपटांमध्ये भूमिका देता येईल, अशी टिप्पणी केली.

सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना राजपाल यादव म्हणाले, 'चित्रपटांसाठी कर्ज घेतले जात नाही. मी आधी स्वतःच शंभर चित्रपटांवर काम करत आहे, मग एक चित्रपट बनवण्यासाठी मला कर्जाची गरज का लागेल? माझ्या देशाबद्दल , सर्वोच्च न्यायालयाबद्दल आणि न्यायव्यवस्थेबद्दल मला आदर आहे. कोणताही निर्णय घेतला गेला तरी तो सर्वांना मान्य असेल.' असे राजपाल यादव म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >