Sunday, November 22, 2026

गोव्यात IFFI महोत्सवात महाराष्ट्राचे विशेष दालन; चित्रनगरीच्या 50 वर्षांचा गौरव

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, विविध सेवा-सुविधा आणि विकासात्मक उपक्रमांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करून देण्याच्या उद्देशाने एक विशेष दालन तयार केले आहे.

गोवा: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, विविध सेवा-सुविधा आणि विकासात्मक उपक्रमांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करून देण्याच्या उद्देशाने एक विशेष दालन तयार केले आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून साकारलेल्या या दालनात चित्रनगरीसह महाराष्ट्रातील चित्रीकरण सुविधा, महामंडळाच्या विविध योजना, उपक्रम, सेवा, कार्यक्रम आणि अभियानांची माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहेत.

सन 2015 पासून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ दरवर्षी 'इफ्फी'मध्ये सहभागी होत असते. मराठी सिनेमा आणि महाराष्ट्रातील चित्रीकरण परिसंस्था यांचा परिचय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमात सहभागी होत असतात. यंदादेखील महामंडळाने या महोत्सवात आपला सहभाग नोंदवला असून महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती परिसंस्थेचे सामर्थ्य आणि वैविध्य अधोरेखित करणारे विशेष दालनही महामंडळाने या महोत्सवात उभारले आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओ, चित्रीकरण स्थळे आणि निर्मितीविषयक सुविधांची माहिती देतानाच चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही ओळख या दालनात करून देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चित्रीकरण करू पाहणाऱ्या देश-विदेशांतील निर्माते, दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थांसाठी हे दालन माहितीचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

दरम्यान, चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीच्या अनुषंगाने महामंडळाच्या कार्याचा व्यापक पट या दालनातून उलगडण्यात आला आहे. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यापासून ते विविध योजना, सेवा, कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यापर्यंत महामंडळाने केलेल्या प्रयत्नांची माहिती या दालनातून भेट देण्यात येणाऱ्यांना देण्यात येत आहे. यासंदर्भात तुम्हाला महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दालनातून महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीच्या सुविधा, उपक्रम आणि संधींची माहिती घेता येणार आहे.

व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील काय म्हणाल्या?

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून उभारण्यात आलेल्या या दालनातून महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीच्या समृद्ध परिसंस्थेचे सर्वांगीण दर्शन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. चित्रीकरणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा, महामंडळाच्या विविध योजना, उपक्रम, सेवा आणि कार्यक्रमांची माहिती येथे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘इफ्फी’सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्राची चित्रपट निर्मिती क्षमता, येथील सुविधा आणि भविष्यातील संधी जागतिक चित्रपट क्षेत्रासमोर मांडण्याची ही महत्त्वपूर्ण संधी आहे, असे त्या म्हणाल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >