
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथे उभारण्यात येत असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या (एसटीपी) कामाची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी आज प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या स्थापत्य, यांत्रिकी तसेच विद्युत अभियांत्रिकी कामांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मलजलावर द्वितीय स्तरीय (सेकंडरी) प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक वाहिनी काम ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत, तर संपूर्ण प्रकल्पाचे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रकल्पस्थळी आवश्यक मनुष्यबळ वाढविण्यात आले असून १ ऑक्टोबर २०२६ पासून सुमारे १ हजार मनुष्यबळ कार्यरत आहे. प्रकल्प पूर्णत्वास येईपर्यंत ही अतिरिक्त मनुष्यबळाची कुमक कायम ठेवण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.
मुंबई मलनि:सारण प्रकल्प विभागाच्या वतीने ३३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये सिक्वेन्शियल बॅच रिऍक्टर तंत्रज्ञानाचा वापर प्रस्तावित आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा विविध प्रयोजनांसाठी पुनर्वापर करण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासह सागरी पर्यावरण व जलचर जीवनाच्या संवर्धनास मदत होणार आहे. घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर परिसरातील नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे.
प्रकल्प स्थळाच्या पाहणीदरम्यान बांगर यांनी मलजल प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रक्रिया टाक्या, इनलेट व आउटलेट व्यवस्था, पंप हाऊस, स्लज प्रक्रिया युनिट, अंतर्गत पाइपलाइन तसेच अन्य स्थापत्य कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यासोबतच पंप, एरेशन ब्लोअर्स, स्क्रीनिंग व स्लज प्रक्रिया यंत्रणा, विविध यांत्रिक उपकरणे आणि पाइपिंगच्या उभारणीची पाहणी करण्यात आली. विद्युत अभियांत्रिकी कामांमध्ये ट्रान्सफॉर्मर, विद्युत पॅनेल, केबलिंग, मोटर्सना वीजपुरवठा, नियंत्रण व ऑटोमेशन प्रणाली, स्काडा तसेच बॅकअप वीज व्यवस्थेच्या कामांचाही बांगर यांनी आढावा घेतला.
मलजलावर द्वितीय स्तरीय (सेकंडरी) प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक वाहिनी काम ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत, तर संपूर्ण प्रकल्पाचे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रकल्पस्थळी आवश्यक मनुष्यबळ वाढविण्यात आले असून दिनांक १ ऑक्टोबर २०२६ पासून सुमारे १ हजार मनुष्यबळ कार्यरत आहे. प्रकल्प पूर्णत्वास येईपर्यंत ही अतिरिक्त मनुष्यबळाची कुमक कायम ठेवण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.
प्रकल्पाचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व कामे समांतर पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करावीत. कामाच्या ठिकाणी गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देशही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनि:सारण प्रकल्प) राजेंद्र परब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.






