Friday, October 9, 2026

मुंबई CSMT स्थानकावर बनावट रेल्वे ID कार्डचा पर्दाफाश! तिकिट तपासणी अधिकाऱ्याकडून आरोपीवर कारवाई

Mumbai CSMT: पुन्हा एकदा मुंबई CSMT स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्याचं बनवाट ओळखपत्र वापरणाऱ्या प्रवाशाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबई: मुंबई CSMT स्थानकावर तिकिट तपासणी अधिकाऱ्यांनी खोटं ओळखपत्र वापरणाऱ्या चोरट्याला पकडलं आहे. गुरुवार 8 ऑक्टोबर रोजी दुपारी मुंबई CSMT स्थानकावर तिकिट तपासणी अधिकाऱ्यांनी बनावट रेल्वे कर्मचाऱ्याच्या ओळखपत्राचा वापर करणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे. श्रेयस रावराणे असं या प्रवाशाचं नाव असून तो स्टेशनवर ज्युनियर इंजिनिअर म्हणून काम करत असल्याची त्याने पोलिसांना माहिती दिली आहे.

तिकिट तपासणी अधिकारी प्रसाद करालकर नेहमीप्रमाणे मुंबई CSMT स्थानकावर प्रवाशांच्या तिकिट तपासणीचं काम करत होते. काम करत असताना प्रसाद यांच्यासमोर श्रेयस रावराणे सुद्धा आला. प्रसाद यांच्यासमोर श्रेयस आल्यानंतर त्यांनी त्याकडेही तिकिट विचारलं. त्याने तिकिट न दाखवता थेट रेल्वेचं ओळखपत्र दाखवलं. प्रसाद यांनी श्रेयसचं ओळखपत्र हातात घेतल्यानंतर त्यांच्या मनात शंका आली. त्यांनी हे ओळखपत्र खोटं असल्याचं सांगितलं. त्यानंतर ओळखपत्राची सत्यता पडताळल्यानंतर ते ओळखपत्र खोटं असल्याची माहिती समोर आली.

 

रेल्वे अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी श्रेयसची कसुन चौकशी करताना त्याने खोटं ओळखपत्र असल्याचं कबुल केलं. ते ओळखपत्र त्यानेच बनवलं असल्याचं सांगितलं. आरोपीने गुन्हा कबुल केल्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला CSMT येथील शासकीय रेल्वे पोलिसांच्या (GRP) ताब्यात देण्यात आले. प्रवाशाने आपण ज्युनियर इंजिनिअर असल्याचा दावा केला. रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, रावराणे याने तो सीएसएमटी स्थानकावरील अभियांत्रिकी कार्यालयात काम करत असल्याचा दावा केला. बनावट ओळखपत्र किंवा बनावट तिकिट सादर करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा मुंबईतील रेल्वे स्थानकांवर हा प्रकार घडलेला आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या 'एक्स'च्या अधिकृत अकाऊंटवरील एका पोस्टमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगण्यात आलेला आहे. विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक (डीसीटीआय) विभागांतर्गत विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. तिकिट तपासणी अधिकारी प्रसाद करालकर ह्यांनी मुंबई CSMT स्थानकावर वातानुकूलित (एसी) लोकलमध्ये तिकिट तपासणीचं काम केलं. या तपासणीदरम्यान, त्यांनी ही मोठी कारवाई केलेली आहे. मध्य रेल्वेने सहा महिन्यांत 159.34 कोटी रुपयांची वसूली केली. याव्यतिरिक्त, मध्य रेल्वेने एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान विना तिकिट प्रवास करणाऱ्या 20.47 लाख प्रवाशांकडून दंडाच्या स्वरूपात 159.34 कोटी रुपये वसूल केल्याचे कळवले आहे. तिकीट तपासणी मोहिमांचा उद्देश भाडे चुकवेगिरीला आळा घालणे, रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण करणे आणि प्रवाशांना वैध तिकिटासह प्रवास करण्यास प्रोत्साहित करणे हा असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >