Monday, October 12, 2026

सणासुदीत भेसळखोरांवर FDA चा बडगा! अनेक आस्थापनांवर कारवाई

महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई केली असून सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांविरोधात प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रतिबंधित गुटखा, संशयित खाद्यतेल, दूषित दूध आणि पनीरच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : सणासुदीच्या कालावधीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर चाप बसवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर धडक मोहीम हाती घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून, यादरम्यान राज्यभरातून कोटी रुपयांचा प्रतिबंधित आणि दर्जाहीन अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली असून काही बड्या आस्थापनांचे परवानेही तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

पालघरमध्ये 11 कोटींहून अधिकचा प्रतिबंधित गुटखा जप्त

पालघर विभागात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक पकडला. 9 ऑक्टोबर 2026 रोजी मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून विक्रीच्या उद्देशाने नेण्यात येणारा 11 कोटी 30 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा आणि 1 कोटी 20 लाख रुपयांचे वाहन, असा एकूण 9 कोटी 15 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालक, क्लीनरसह 6 जणांविरुद्ध मनोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत झेप्टो आणि ब्रिजवासीचे परवाने निलंबित

मुंबईत अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत मालाडमधील ‘मे. क्रिष्णम रिटेल्स एलएलपी (ब्रिजवासी)’ आणि भांडुप येथील ‘मे. झेप्टो लिमिटेड’ यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या त्रुटी आढळल्यामुळे आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन्ही आस्थापनांचे FSSAI परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

कोकणात दूषित दूध आणि पनीर नष्ट

तळोजा (जि. रायगड) येथे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन व साठवणूक केंद्रांवर धडक तपासणी करण्यात आली. मे. सावरिया मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे वैध परवान्याशिवाय दूध साठवणूक करणे, बिले नसणे आणि म्हशीच्या दुधात स्किम्ड मिल्क मिसळल्याच्या संशयावरून 5 हजार 394 लिटर दूध जागेवर नष्ट करण्यात आले. तसेच मे. महेश्वरी फोर्ड्स येथे पनीर उत्पादन कक्षात पाल आढळल्याने आणि अत्यंत अस्वच्छता असल्यामुळे 119 किलो लो-फॅट पनीर नष्ट करण्यात आले. या कारवाईत एकूण सुमारे 3 लाख 88 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा दुग्धजन्य साठा नष्ट करण्यात आला असून 3 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये कारवाई

पुणे विभागात खाद्यतेलाची धडक तपासणी करण्यात आली असून, 9 हजार 675 किलो वजनाचा आणि सुमारे 1 कोटी 21 लाखांहून अधिक किमतीचा संशयित व दर्जाहीन खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच पुणे विभागात 7 हॉटेल आणि ढाब्यांवर कारवाई करण्यात आली असून, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या 4 आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातही प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवून लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >