
नवी दिल्ली : कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे निर्मित तिसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट ‘मांग्रोल’ सोमवारी अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या सागरी ताफ्यात दाखल झाले आहे. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित विशेष इंडक्शन समारंभात या युद्धनौकेचा नौदलात समावेश करण्यात आला. यामुळे भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्धक्षमता अधिक मजबूत होणार आहे.
किनारी सुरक्षेत होणार मोठी वाढ
किनारपट्टीलगतच्या उथळ पाण्यात मोठ्या युद्धनौकांना कार्यरत राहण्यात अनेकदा अडचणी येतात. अशा बिकट परिस्थितीत ‘मांग्रोल’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या युद्धनौकेच्या समावेशामुळे बंदरे, हार्बर आणि किनारी सागरी मार्गांच्या सुरक्षेत मोठी वाढ होणार आहे. तसेच, मोठ्या नौदल ताफ्याच्या मोहिमांनाही यामुळे मोलाची मदत मिळणार आहे.
ऐतिहासिक वारसा आणि नामकरणाची पार्श्वभूमी
मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल संजय वात्स्यायन होते. गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील किनारी शहर आणि प्रमुख मासेमारी बंदर असलेल्या मांग्रोलच्या नावावरून या युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे. ही युद्धनौका पूर्वीच्या आयएनएस मांग्रोल (एम-85) या युद्धनौकेचा वारसा पुढे चालवणार असून, जुन्या युद्धनौकांचा वारसा जतन करण्याची नौदलाची परंपरा यानिमित्ताने कायम ठेवण्यात आली आहे.
'आत्मनिर्भर भारत'चे उत्तम प्रतीक
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करून ‘मांग्रोल’ची निर्मिती करण्यात आली आहे. ही युद्धनौका रचना, बांधणी तसेच प्रगत शस्त्रे आणि सेन्सर यांचे एकत्रीकरण करण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचे उत्तम प्रतीक आहे. 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत तयार झालेली ही युद्धनौका संरक्षण क्षेत्रातील जहाजबांधणीच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मुंबई : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोध करण्यासाठी ठाकरे बंधूंनी केलेल्या आंदोलनावर मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री ...
अत्याधुनिक शस्त्रे आणि प्रगत यंत्रणा
‘मांग्रोल’ युद्धनौकेमध्ये वॉटर जेट प्रोपल्शन प्रणाली असलेल्या तीन डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे उथळ पाण्यातही तिला अत्यंत चांगल्या प्रकारे हालचाली करता येतात. किनारी भागातील पाण्याखालील धोक्यांचा शोध घेण्यासाठी यात अभय हल-माउंटेड सोनार, हलके टॉर्पेडो, स्वदेशी अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर आणि मारीच ॲडव्हान्स्ड टॉर्पेडो डिकॉय सिस्टीमचा समावेश करण्यात आला आहे. पाण्याखालील देखरेख, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा आणि माइन वॉरफेअरची कामे करण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे. बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीत पाण्याखालील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी ही युद्धनौका सागरी गस्त विमाने आणि हेलिकॉप्टरसोबत समन्वयाने काम करणार आहे.






