मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, या उद्देशाने ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अपघातानंतरचा पहिला तास, म्हणजेच ‘गोल्डन अवर’, हा जखमींच्या उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. या निर्णायक काळात जखमींना तातडीने ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवा प्रभावी ठरू शकते, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी केली.
मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, आरोग्य विभागाचे संचालक संजय काटकर, वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक डॉ. सुनील भारद्वाज यांच्यासह मोटार वाहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करून तिला मंजुरी घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात दरवर्षी सुमारे १५ हजार रस्ते अपघात होत असल्याची माहिती आहे. यापैकी अनेक अपघातांमध्ये जखमींना वेळेत उपचार मिळणे हे मोठे आव्हान ठरते. विशेषतः महामार्गांवरील गंभीर अपघात, वाहतूक कोंडी, रुग्णालयापर्यंतचे अंतर आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची उपलब्धता या बाबी लक्षात घेता, अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्रातील सागरी विकासाला गती देण्यासाठी ‘सागरमाला-2’ ...
समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग या महत्वाच्या मार्गांवर अपघातग्रस्तांना जलद वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेअंतर्गत हवाई रुग्णवाहिका सेवेची उपलब्धता, जखमींना सुरक्षितपणे ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्याची कार्यपद्धती आणि विविध आपत्कालीन यंत्रणांमधील समन्वय यांवर विशेष भर देण्यात येणार आहे. हवाई रुग्णवाहिका सेवेसह अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी ट्रॉमा केअर सेंटरचे जाळे निश्चित करणे, सेवा पुरवठादारांचे पॅनेल तयार करणे, रस्ता सुरक्षा निधीतून आवश्यक आर्थिक तरतूद करणे आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी प्रमाणित कार्यपद्धती विकसित करणे, अशा उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.