मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई मोहीम उघडली आहे. बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे, तर मुंबईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नामांकित 'डॉमिनोज पिझ्झा'सह (Dominiz Pizza) 3 आस्थापनांचे परवाने व नोंदणी तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांवर मोठी कारवाई
दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी बीड जिल्ह्यातील लिंबागणेश येथे प्रशासनाने केलेल्या कारवाईत प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध वाहतूक करताना 4,60,056 रुपयांचा साठा आणि 5,40,000 रुपये किमतीचे वाहन असा एकूण 10,00,056 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 23.35 लाखांचे खाद्यतेल जप्त
छत्रपती संभाजीनगर येथील 'बजरंग ट्रेडिंग कंपनी' (जाफर गेट, जुना मोंढा) या खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर छापा टाकण्यात आला. सणासुदीच्या काळात विक्रीसाठी ठेवलेले संशयास्पद, अपमिश्रित व चुकीचे ब्रँडिंग (Misbranded) केलेले रिफाइंड सोयाबीन आणि पामोलीन तेल असा एकूण 12,382 किलो साठा (किंमत ₹23,35,654/-) अन्न सुरक्षा कायद्यान्वये सील करून जप्त करण्यात आला असून युनिटचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) शनिवार आणि रविवारच्या सुट्टयांव्यतिरिक्त ऑक्टोबर महिन्यात काही निवडक दिवशी बंद राहील. तसेच ...
मुंबईत 'डॉमिनोज'सह 3 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई विभागातील तीन प्रमुख अन्न आस्थापनांच्या तपासणीत गंभीर नियमबाह्य बाबी समोर आल्याने त्यांचे परवाने/नोंदणी निलंबित करण्यात आली:
• ज्युबिलंट फूडवर्क्स लि. (डॉमिनोज पिझ्झा - परळ): शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थ एकाच डीप फ्रिजमध्ये शेजारी साठवणे, एकाच ओव्हन/ग्रिलवर चिकन व पनीर तयार करणे आणि सुधारणा नोटीस देऊनही गाफील राहिल्याने परवाना निलंबित करण्यात आला.
• माझ फूड पार्सल अँड केटरिंग (भांडुप): स्वयंपाकघरात झुरळांचा प्रादुर्भाव, तुंबलेली गटारे, मेनूमध्ये बटर नमूद असताना फॅट स्प्रेडचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करणे या कारणांमुळे परवाना निलंबित झाला.
• मुघल ढाबा (कुर्ला पश्चिम): Zomato वरून मागविलेले शिळे अन्न मिळाल्याच्या तक्रारीवरून तपासणी केली असता, घाण पाणी, उघडे मागील दार, गंजलेली भांडी आणि कचराकुंड्या उघड्या आढळल्याने नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षेबाबत प्रशासनाची ही कडक भूमिका असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे.