Wednesday, October 14, 2026

Ghatkopar accident : घाटकोपरमध्ये बेस्ट बस आणि टँकरचा अपघात; बसच्या काचा फुटल्या, दोन तरुणी जखमी

दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील छेडा नगर सिग्नल परिसरात बेस्ट बस आणि टँकर यांच्यात अपघात झाल्याची घटना बुधवारी, 14 ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. या अपघातात बसच्या उजव्या बाजूच्या 3 खिडक्यांच्या काचा फुटल्या असून, दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.55 वाजण्याच्या सुमारास मार्ग क्रमांक A-373/32 वरील बस क्रमांक 7363 (MH-03-CV-7035) वैशाली नगर येथून माहुलच्या दिशेने जात होती. मुलुंड डेपोची ही बस छेडा नगर सिग्नलजवळ आली असता, अचानक एक दुचाकी बससमोर आली. त्यामुळे बसचालकाने तातडीने ब्रेक लावून बस थांबवली.

याचदरम्यान मुंबईहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या एका टँकरची बसच्या उजव्या बाजूच्या मधल्या भागाला धडक बसली. या धडकेमुळे बसच्या उजव्या बाजूच्या 3 खिडक्यांच्या काचा फुटल्या. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.

जखमींना रुग्णालयात दाखल

या अपघातात भाग्यश्री खेडकर (वय 14) आणि आदिती कोयंडे (वय 22) या दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या. बसच्या वाहकाने दोघींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. आणखी एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली होती; मात्र त्यांनी रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिला. तर अन्य एका जखमी प्रवाशाला त्याच्या नातेवाइकांनी दुसऱ्या रुग्णालयात नेले.

या घटनेची माहिती 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.40 वाजता राजावाडी रुग्णालयाकडून मिळाल्याची नोंद आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पुढील माहिती मिळणे बाकी आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >