Wednesday, October 14, 2026

Dattatray Bharne: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीसाठी कोणत्याही अटी नाही, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीसाठी कोणत्याही अटी-शर्ती लागू नसतील, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीसाठी कोणत्याही अटी-शर्ती लागू नसतील, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी दिली. राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, खरिपाच्या सुमारे एक कोटी 25 लाख हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण करून अंतिम अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारकडून दुष्काळी मदत मिळविण्यासाठी काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या निर्णयानुसार पाच हजार रुपयांची आगाऊ मदत देण्यात येणार आहे. या मदतीसाठी कोणत्याही अटी नसतील. त्यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येईल, असे भरणे यांनी सांगितले. राज्यात खरिपाचे एकूण क्षेत्र सुमारे एक कोटी 50 लाख हेक्टर आहे. त्यापैकी एक कोटी 25 लाख हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, हे प्रमाण सुमारे 83 टक्के आहे.

 
 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागांकडून पंचनाम्यांचे काम सुरू आहे. उर्वरित काम निर्धारित मुदतीत पूर्ण करून केंद्राला अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून मदत मिळण्याबाबतही राज्य सरकारला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा भरणे यांनी केला. गेल्या चार ते पाच दिवसांत केंद्रीय पथकाने राज्यातील तीन विभागांमधील 56 गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या पथकाने रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्य सरकारने सादर केलेल्या मदतीच्या प्रस्तावाबाबत पथकाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे भरणे यांनी सांगितले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा केली असून, केंद्राकडून लवकर मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा