
मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देणार आहे, तर भाजप आणि अन्य मित्रपक्षांनी कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरू होती. दोन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा तिढा कायम होता. शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांना एबी फॉर्मही देण्यात आला होता. त्यावेळी या जागेबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर चिवटे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने ही जागा भाजपला सुटल्याची चर्चा असतानाच, आता शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री उदय सामंत यांच्यात झालेल्या बैठकीनंतर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी त्यांच्या आगामी 'रणबाली' या पिरियड ॲक्शन ड्रामा चित्रपटाच्या ...
सचिन सानप (Sachin Sanap) हे मंत्री उदय सामंत (Uday Saman) यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरताना शिक्षकांचे प्रश्न जाणणारा आणि त्यांच्या समस्या समजून घेणारा शिक्षकच आमदार असावा, अशी भूमिका मांडली आहे. या भूमिकेला पाठिंबा मिळावा यासाठी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटल्याचे सानप यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. शिक्षक, प्राध्यापक आणि विविध शिक्षक संघटनांकडून आपल्या उमेदवारीसाठी तयारी सुरू असल्याचेही सानप यांनी सांगितले होते. शिंदे यांच्याकडून सकारात्मक निर्णय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. आता शिवसेनेने सानप यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांच्या उमेदवारीला पक्षीय पाठबळ मिळाले आहे.
मतविभाजनाचा मुद्दा निर्णायक
पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत मतभेद असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. शिवसेना या जागेवर निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे या घडामोडींमधून स्पष्ट झाले. अखेर सानप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याने भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे समर्थित अपक्ष उमेदवार सानप यांच्यात लढत होणार आहे. महायुतीतील दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने या निवडणुकीत मित्रपक्षांमधील मतविभाजनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील या लढतीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






