Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल राज्य मंत्रिमंडळाकडून अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी मांडला प्रस्ताव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अभिनंदनाचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात या ठरावाचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेली विकासकामे, गरीब आणि वंचितांसाठी राबविलेल्या योजना, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि महाराष्ट्राला मिळालेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा ठरावात गौरव करण्यात आला.

महाराष्ट्रातील १२ लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांसह विविध योजनांचा गौरव


मुंबई : घटनात्मक पदावर राहून सलग २५ वर्षे जनसेवा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी मांडलेला अभिनंदनाचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात या ठरावाचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेली विकासकामे, गरीब आणि वंचितांसाठी राबविलेल्या योजना, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि महाराष्ट्राला मिळालेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा ठरावात गौरव करण्यात आला.


मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘मी पंतप्रधान नाही, तर प्रधानसेवक आहे’, ‘संविधान हाच माझा धर्मग्रंथ आहे’ आणि ‘कर्मयोग महत्त्वाचा आहे’, या भूमिकांमधून मोदी यांनी जनसेवेचा आदर्श मांडला. गरीब आणि वंचितांना केंद्रस्थानी ठेवून घर, वीज, पाणी, स्वयंपाकाचा गॅस, शौचालये आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सुशासनाचे नवे प्रारूप देशात उभे केले. वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणून अर्थव्यवस्थेला बळ देण्याचा प्रयत्न झाला. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांसारख्या कारवाया तसेच संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेमुळे भारताची जागतिक स्तरावरील प्रतिमा अधिक मजबूत झाली, असे फडणवीस म्हणाले. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय आणि भारतीयांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या भूमिकांचाही त्यांनी उल्लेख केला.



छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा नौदलाच्या ध्वजावर समावेश, महाराजांचे १२ गड-किल्ले जागतिक वारसा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय ही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची कामे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठी भाषेसाठी उत्कृष्टता केंद्र उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या काळात महाराष्ट्रात सुमारे १२ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून काही पूर्ण झाले आहेत. मेट्रो, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर आणि नवी मुंबई विमानतळ या प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत महाराष्ट्राला सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असून या योजनेतील सर्वाधिक प्रकल्प राज्यात पूर्ण झाले किंवा प्रगतिपथावर आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील ९१ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला. प्रधानमंत्री कुसुम योजनेतून राज्याला ११ लाख ८० हजार कृषी पंप मिळाले, तर प्रधानमंत्री आवास योजनेतून ४३ लाख घरे बांधण्यात आली किंवा बांधकामाधीन आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. इंदू मिल येथील स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त समतेचा विचार देशभर पोहोचविण्याच्या उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला.


पंतप्रधानांना ठराव पाठवणार


महाराष्ट्रात ४.४० कोटी आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आली असून ९१ लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ९० लाख शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध झाले, तर जनधन योजनेअंतर्गत सुमारे ३.८३ कोटी खाती उघडण्यात आली, अशी आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रधानमंत्री पोषण योजनेतून २.९६ कोटी बालकांना पोषण आहार, तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून २१ लाख ४६ हजार महिलांना लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यात २९ हजार पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या असून ४० लाख नागरिकांना घराच्या मालकीची स्वामित्व कार्डे मिळाली आहेत. ‘विकसित भारत जी रामजी’ उपक्रमातून दोन कोटी मनुष्यदिन रोजगारनिर्मिती झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला. मुद्रा योजनेतील कर्जवाटप, महाराष्ट्राचे देशातील स्टार्टअप केंद्र म्हणून झालेले स्थान, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, ग्रामीण भागातील रेल्वे सुविधांचा विस्तार आणि औद्योगिक विकासासाठी उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला चालना मिळाल्याचे फडणवीस म्हणाले.


नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगरमधील संरक्षण उद्योगाशी संबंधित उपक्रम, दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिका आणि छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटी यांचाही त्यांनी उल्लेख केला. भारताला सुरक्षित, समृद्ध, आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने मोदी यांनी नेतृत्व दिल्याचे नमूद करत राज्य मंत्रिमंडळाने त्यांचे आभार मानले आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा अभिनंदनाचा ठराव पंतप्रधानांकडे पाठविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Ghatkopar accident : घाटकोपरमध्ये बेस्ट बस आणि टँकरचा अपघात; बसच्या काचा फुटल्या, दोन तरुणी जखमी

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील छेडा नगर सिग्नल परिसरात बेस्ट बस आणि टँकर यांच्यात अपघात झाल्याची घटना

Wastewater Reuse : सोसायट्यातील झाडांना सांडपाणी किंवा वापरानंतरच्या पाण्याचा वापर करा, महापालिकेने केले गृहनिर्माण संस्थांना आवाहन

मुंबई विशेष प्रतिनिधी झाडांना पाणी देताना शक्यतो पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा. त्याऐवजी सांडपाणी

Draft Voter List 2026 : प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी

BMC : प्रकल्प कामे अंतिम टप्प्यात, महापालिकेचा मुदतठेवींना हात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या रकमेची चर्चा कायमच होत असते. मार्च महिन्यात मुदत

Nalasopara fire : नालासोपाऱ्यात इम्पीरियल हाइट्स इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू

नालासोपारा : मुंबईजवळील नालासोपारा येथील इम्पीरियल हाइट्स ( Imperial Heights) इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 24 विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : भारतीय इतिहासात 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारलेला दिवस