
मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच वर्षअखेरीपर्यंत राज्यात ४ हजार ५०० अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे. एकात्मिक नियंत्रण कक्ष, जीपीएस यंत्रणा आणि प्रगत जीवनरक्षक उपकरणांच्या मदतीने रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
सध्या अपघात आणि गंभीर आजारांसाठी १०८, तर गर्भवती महिला आणि बालकांसाठी १०२ ही रुग्णवाहिका सेवा स्वतंत्रपणे कार्यरत आहे. दोन्ही सेवांमधील तांत्रिक अडचणी आणि समन्वयाच्या अभावामुळे काही वेळा रुग्णवाहिका मिळण्यास विलंब होतो. ही अडचण दूर करण्यासाठी दोन्ही सेवांचे एकत्रीकरण करून एकाच मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून मदतीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचे व्यवस्थापन केले जाणार आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी संपर्क साधल्यानंतर जवळ उपलब्ध असलेली रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल.
देवेंद्र फडणवीसांसोबत स्वतः भेट घेतल्याची सांगितली आठवण मुंबई : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली ...
नव्या रुग्णवाहिकांच्या ताफ्यात प्रगत जीवनरक्षक सुविधा असलेल्या ‘ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट’ (एएलएस) आणि ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ (बीएलएस) रुग्णवाहिकांचा समावेश असेल. सर्व रुग्णवाहिका जीपीएस प्रणालीशी जोडण्यात येणार असल्याने त्यांचे ठिकाण नियंत्रण कक्षाला समजू शकेल. त्यामुळे गरजेनुसार जवळची रुग्णवाहिका पाठविणे आणि रुग्णाला रुग्णालयात पोहोचविण्याचा कालावधी कमी करणे शक्य होईल. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागांतील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठीही या व्यवस्थेचा उपयोग होणार आहे.
अपघात, हृदयविकार आणि अन्य गंभीर वैद्यकीय परिस्थितींमध्ये सुरुवातीचा एक तास उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या कालावधीत वैद्यकीय मदत मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचविण्याची शक्यता वाढते. रुग्णवाहिका सेवांचे एकत्रीकरण झाल्यानंतर मदत पोहोचण्यास लागणारा वेळ कमी होण्यास मदत होईल. विशेषतः दुर्गम भागांतील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात सुरक्षितपणे पोहोचविणे आणि गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देणे अधिक सुलभ होईल. राज्यातील प्रत्येक नागरिकाला वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. १०२ आणि १०८ सेवांचे एकत्रीकरण, अत्याधुनिक रुग्णवाहिका, जीपीएस प्रणाली आणि एकात्मिक नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.





