"खरी व्होटचोरी 2019 मध्ये झाली...", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

"महाराष्ट्रातील जनतेने 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीला मतदान करून जनादेश दिला होता. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी त्या जनादेशाचा गळा घोटून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले.", अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

मुंबई: "महाराष्ट्रातील जनतेने २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला मतदान करून जनादेश दिला होता. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी त्या जनादेशाचा गळा घोटून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले. हीच खरी व्होटचोरी होती. जनतेच्या मतांवर दरोडा टाकणाऱ्यांनी आज व्होटचोरीच्या नावाने गळा काढू नये, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. गोरेगाव येथील नेस्को संकुलात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, रामदास कदम, गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. शिंदे म्हणाले, “आज जे लोक व्होटचोरीच्या गप्पा मारत आहेत, त्यांनी खरी व्होटचोरी 2019 मध्ये केली. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत दिले होते. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी जनादेशाचा गळा घोटून, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तो लोकशाहीवर टाकलेला सर्वांत मोठा दरोडा होता. व्होटचोरी नाही, तर हा डाका होता; डाका नाही, तर मोठा दरोडा होता. आणि तुम्ही आम्हाला व्होटचोरी सांगता?”



“तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू किंवा हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस जिंकते, तेव्हा ईव्हीएम चांगले असते. मात्र, पराभव दिसू लागला की ईव्हीएम खराब असल्याचा आरोप केला जातो आणि व्होटचोरीचा कांगावा सुरू होतो. काँग्रेसने ७० वर्षे देशात निवडणुका जिंकण्यासाठी बूथ कॅप्चरिंग केले, ती खरी व्होटचोरी होती. मतदार याद्यांमध्ये दुबार नावे आहेत का, याची तपासणी झाली पाहिजे. मतदारांची संख्या वाढली तरी आक्षेप आणि कमी झाली तरी आक्षेप. एकदा म्हणता वाढली कशी, तर दुसऱ्यांदा म्हणता कमी कशी झाली? हे काय चालले आहे?” असा सवाल त्यांनी केला.


शिंदे म्हणाले, "एका हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान घ्यायचे आणि संविधानाने निर्माण केलेल्या सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवर हल्ले करायचे, हे कुठले देशप्रेम? भारताच्या इतिहासात कधी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चे काढले गेले होते का? संविधानाचे नाव घ्यायचे आणि त्याच संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, हा संविधानाचा अपमान आहे. संविधान खतरे में, संविधान खतरे में, असे म्हणता; पण तुम्ही तर देश तोडायला निघालात,” असे ते म्हणाले.



"विरोधक नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेतील जाळपोळीची उदाहरणे देऊन भारतात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लक्षात ठेवा, हा नेपाळ नाही, ही श्रीलंका नाही, हा बांगलादेश नाही, हा पाकिस्तान नाही; हा हिंदुस्तान आहे, हिंदुस्तान! हा नवा भारत आहे. पाकिस्तानच्या घरात घुसून मारणारा हा हिंदुस्तान आहे. देशात अशांतता पसरवणाऱ्यांचे मनसुबे 140 कोटी जनता उधळून लावेल,” असा इशारा त्यांनी दिला. "निवडणुकांमध्ये जनता सरकार बदलत असते. कोणाला सत्तेवर बसवायचे आणि कोणाला खाली उतरवायचे, हे जनता ठरवत असते. जनतेने ज्यांना सलग तीन वेळा नाकारून रिजेक्टची हॅटट्रिक केली आहे, ते आज ‘रिजीम चेंज’च्या बाता मारत आहेत. ज्यांना स्वतःच्या पक्षातील सत्तापालट रोखता आला नाही, ते देशाची सत्ता काय बदलणार?”, असा टोलाही त्यांनी लगावला.




'इंडिया’ आघाडी म्हणजे दहा तोंडांचा रावण


- विरोधकांच्या‘इंडिया’ आघाडीवर टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आघाडीची तुलना दहा तोंडांच्या रावणाशी केली. विरोधकांकडून संविधान आणि लोकशाही धोक्यात असल्याचा खोटा प्रचार केला जात असून, विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधी वातावरण निर्माण करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आणीबाणीचा संदर्भ देत शिंदे म्हणाले, “1975 मध्ये आणीबाणी लागू झाली, तेव्हा विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले, पत्रकारितेवर निर्बंध आले आणि न्यायव्यवस्थेवर बंधने आली. आज विरोधकांना मोर्चे काढण्याचे, आंदोलने करण्याचे आणि माध्यमांसमोर भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. तरीही संविधान आणि लोकशाही धोक्यात असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. हा फेक नॅरेटिव्ह आहे. जनतेने या प्रचाराला बळी पडू नये.”  काँग्रेसच्या पूर्वीच्या सरकारांच्या कारभारावर टीका करताना शिंदे यांनी कॉमनवेल्थ, 2G स्पेक्ट्रम आणि बोफोर्स यांसारख्या प्रकरणांचा उल्लेख केला. दहशतवादाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पूर्वी पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना पत्रव्यवहाराद्वारे उत्तर दिले जात होते; मात्र आता भारताने ठोस कारवाईची भूमिका घेतली आहे, असे ते म्हणाले. आपल्या लंडन दौऱ्यावरून होणाऱ्या टीकेलाही शिंदे यांनी उत्तर दिले. “लंडनमध्ये मराठी भाषेचा गौरव केला, भारतमातेचा जयघोष केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. महाराष्ट्राचे व्हिजन, विकास आणि ब्रँडिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडले. मराठीत बोललो तरी पोटदुखी, इंग्रजीत बोललो तरी पोटदुखी, गावाला गेलो तरी पोटदुखी, दिल्लीला गेलो तरी पोटदुखी आणि लंडनला गेलो तरी अॅसिडिटी,” अशा शब्दांत त्यांनी उबाठा गटावर टीका केली.




शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अतिवृष्टी असो वा दुष्काळ, शेतकरी संकटात असताना शिवसैनिक कधीही घरात बसत नाही. सध्या राज्यावर दुष्काळाचे भीषण सावट आहे. अशा संवेदनशील काळात आरोप-प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. आम्ही पोकळ भाषणे ठोकणारे नेते नसून शेतकऱ्यांच्या घरात राशन पोहोचवणारे आणि त्यांची चूल पेटवणारे कार्यकर्ते आहोत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही.” शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या वतीने 100 ट्रक शिधा दुष्काळग्रस्त भागांत रवाना करण्यात आल्याचे सांगून पुढील टप्प्यांतही मदत सुरू राहणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. शेतकरी कुटुंबांतील महिलांसाठी 25 हजार शिलाई मशिन्स आणि मुलींसाठी 25 हजार सायकलींचे वाटप सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळामुळे विवाह रखडलेल्या शेतकरी कुटुंबांतील मुलींसाठी शिवसेना स्वतःच्या खर्चाने सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पाच हजार रुपयांची मदत ही तातडीची असून, त्याव्यतिरिक्त दुष्काळासाठीच्या शासकीय सवलती आणि नुकसानभरपाईही शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Priyanka Chaturvedi: नेत्या प्रियंका चतुर्वेदींचा संजय राऊतांना घरचा आहेर, नेमक्या काय म्हणाल्या?

मुंबई: अल्बानियातील हिंसक आंदोलनाच्या संदर्भात उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर माजी खासदार

Kolkata Stampede: अरुंद प्रवेशद्वार, अंधार अन् अफवा; दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीचं कारण काय?

कोलकाता येथील चोरबागान दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, आयोजकांच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना