Tuesday, October 20, 2026

मनोज जरांगेंच्या संपत्तीची चौकशी करा! रामदास कदमांची मागणी

मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत 500 कोटी रुपयांचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी नारायणगड येथील दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत 500 कोटी रुपयांचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी जरांगे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली. “500 कोटी रुपये दिल्याचा आरोप करत असाल, तर त्याचे पुरावे द्या,” असे आव्हान त्यांनी दिले. याच मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला.

नारायणगड येथील दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे यांनी, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून आपल्या नावाने 500 कोटी रुपये आणले होते का, असा प्रश्न उपस्थित केला होता. हे पैसे आपल्याला देण्यासाठी आणल्याचे भाजपला सांगितले होते का आणि आपल्याला प्रत्यक्षात 500 कोटी रुपये दिले का, असे प्रश्न त्यांनी शिंदे यांना उद्देशून विचारले. या विधानानंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया उमटली.

रामदास कदम यांनी जरांगे यांच्यावर टीका करताना त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली. “तुम्ही एकनाथ शिंदे यांना उद्ध्वस्त करायला निघालात, तर महाराष्ट्र तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. जरांगे यांच्या उपोषणाबाबतही त्यांनी टिप्पणी केली. जरांगे मराठा समाजाचे नेते झाल्यानंतर त्यांची संपत्ती कुठे आहे आणि कोणाच्या नावावर आहे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांना चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील...

दसरा मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पुढील वेळी याच ठिकाणी भाषणासाठी येईन, तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील. एकनाथ शिंदे साहेबांना जो आडवा येईल, त्याचा सत्यानाश होवो. रामसेतूप्रमाणे शिंदे यांनी लोकांना जोडण्याचे काम केले. आमचे शिंदे साहेब देणारे आहेत, घेणारे नाहीत, असेही त्यांनी सांगितले. पक्षातील आमदार आणि खासदारांनी जलसंधारणाच्या कामांवर भर द्यावा, असे आवाहनही गुलाबराव पाटील यांनी केले. जलसंधारणासाठी उपलब्ध निधीपैकी 50 टक्के रक्कम खर्च करण्याची भूमिका त्यांनी मांडली. आपल्या मतदारसंघातील नाले खोल करण्याचे काम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >