Thursday, October 22, 2026

FDA Raids : कोकण, नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागात लाखो रुपयांचा अमानक अन्नसाठा जप्त; 11 आस्थापनांचे परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्रात अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात धडक मोहीम राबवली. कोकण विभागात 33,286 किलो राजमा व कडधान्यांचा सुमारे 50.05 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतही अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून, मुंबई व छत्रपती संभाजीनगर विभागातील 11 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबई: अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात धडक मोहीम राबवली आहे. कोकण विभागात 33,286 किलो राजमा व कडधान्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजित किंमत ₹50.05 लाख आहे. यादरम्यान कोकण, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत निकृष्ट दर्जाचा व चुकीच्या लेबलिंगचा मोठ्या प्रमाणावर अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, नियमभंग व अस्वच्छतेमुळे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील 11 खाद्य आस्थापनांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

1. कोकण विभाग: 33 हजार किलोहून अधिक राजमा व कडधान्य जप्त

21 ऑक्टोबर 2026 रोजी कोकण विभागात केलेल्या कारवाईदरम्यान, नवी मुंबईतील नेरूळ येथील 'मे. आरडीसी ऍग्रो व्हेंचर्स प्रा. लि.' (M/s RDC Agro Ventures Pvt. Ltd.) या आस्थापनेतून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद साठा जप्त करण्यात आला.

  • रेड राजमा स्मॉल: 10,998 किलो (अंदाजित किंमत ₹17,69,860)
  • राजमा (होल), 'बुलेट पल्सेस': 22,288 किलो (अंदाजित किंमत ₹32,34,720)

असा एकूण 33,286 किलो वजनाचा, अंदाजित ₹50,04,580 किमतीचा साठा अन्न सुरक्षा कायद्याच्या विविध कलमांन्वये जप्त करण्यात आला आहे.

2. नाशिक विभाग: खाद्यतेल, तूप आणि फराळाचे पदार्थ जप्त

नाशिक विभागात 21 ऑक्टोबर 2026 रोजी केलेल्या छापेमारीत खालील आस्थापनांवर कारवाई करण्यात आली:

  • श्री संताजी ट्रेडिंग कंपनी (सिन्नर, नाशिक): 240 किलो रिफाइंड सोयाबीन तेल (अंदाजित किंमत ₹43,200). येथे प्रयोगशाळा व तांत्रिक व्यक्तीचा अभाव तसेच विश्लेषण अहवाल न मिळाल्यामुळे तेलाच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त करण्यात आला.
  • मे. न्यू हुमा ट्रेडिंग कंपनी (नाशिक): 153.4 किलो बटर व तूप (अंदाजित किंमत ₹1,18,170).
  • महिपती एंटरप्रायजेस (सिडको, नाशिक): 90 किलो पिवळी शेव व पापडी (अंदाजित किंमत ₹19,000).

या मोहिमेत एकूण 483.4 किलो अन्नपदार्थ (अंदाजित किंमत ₹1,70,370) जप्त करण्यात आले.

3. छत्रपती संभाजीनगर विभाग: गूळ व बडीशेप जप्त

छत्रपती संभाजीनगर येथील 'मे. औरंगाबाद कोल्ड स्टोरेज एलएलपी, जाधववाडी' येथे 21 ऑक्टोबर 2026 रोजी धडक कारवाई करण्यात आली.

  • खुला गूळ: 3,749 किलो (अंदाजित किंमत ₹2,06,195)
  • बडीशेप (Fennel Seeds): 25 किलो (अंदाजित किंमत ₹4,500)
  • स्पेशल सौफ - न्यू बिग बॉस ब्रँड: 448 किलो (अंदाजित किंमत ₹80,640)

एकूण 4,222 किलो साठा (अंदाजित किंमत ₹2,91,335) जप्त करण्यात आला आहे.

4. अस्वच्छता आणि नियमभंगांमुळे 11 आस्थापनांचे परवाने निलंबित

हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी व कॅन्टीनमध्ये अस्वच्छ किचन, ड्रेनेजची समस्या, गंजलेले रॅक व भांडी, शिळा पाव ताज्या पावात मिसळणे, अपूर्ण तापमान नोंदी, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे आणि मिठाईमध्ये अनधिकृत खाद्यरंगांचा वापर यांसारख्या गंभीर त्रुटी आढळल्याने कठोर पावले उचलण्यात आली आहेत.

मुंबई (9 आस्थापना)

  1. M/s SK Bakery (माझगाव)
  2. M/s Nekzad Restaurant (ग्रँट रोड)
  3. M/s Foodies Multi Cuisine (वांद्रे पश्चिम)
  4. M/s Arabian Luqma (जोगेश्वरी पश्चिम)
  5. M/s Zidz Food and Hospitality / Delhi Zaiak (कुर्ला पश्चिम)
  6. M/s Lite Bite Foods Pvt. Ltd. (You Mee) (घाटकोपर पश्चिम)
  7. M/s Bikkgane Biryani LLP (गोवंडी, चेंबूर)
  8. M/s Jubilant Foodworks Ltd (Dominos Pizza) (भांडुप पश्चिम)

छत्रपती संभाजीनगर विभाग (2 आस्थापना)

  1. Dominos Pizza (बीड) — अनुसूची 4 मधील तरतुदींनुसार.
  2. के. के. बेकर्स (रहमत नगर, परभणी) — तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींमुळे कारवाई.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >