Thursday, October 22, 2026

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश! परदेशी महिलेच्या शरीरातून कोकेनच्या 11 कॅप्सुल ताब्यात

महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिला प्रवाशाचा पर्दाफाश केला आहे.

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिला प्रवाशाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका झांबियन महिलेला अटक करण्यात आली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या महिलेने शरीरामध्ये अंमली पदार्थ लपवून भारतात घेऊन येत होती. विमानातून उतरल्यानंतर अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या चौकशीमध्ये महिलेच्या शरीरामध्ये अंमली पदार्थांच्या गोळ्या असल्याचं आढळून आलं. लगेचच तात्काळ अधिकाऱ्यांनी त्या महिलेची चौकशी करत तिला अटक केली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकाने मंगळवारी, 20 ऑक्टोबर रोजी विमानतळावर एका महिला प्रवाशाला अडवले. ती सिएरा लिओनची राजधानी फ्रीटाऊन येथून इथिओपियातील अदिस अबाबा मार्गे मुंबईत आली होती. त्या महिलेने आपल्या शरीरात अंमली पदार्थ लपवले असल्याचा अधिकाऱ्यांना संशय होता. संशयाच्या आधारेच अधिकाऱ्यांनी त्या महिलेची झाडाझडती घेतली त्या आधारे पुढे कारवाई करण्यात आली आहे. 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी केलेल्या वैद्यकीय तपासणी दरम्यान, महिलेच्या शरीरातून पांढरी पावडर असलेल्या 11 कॅप्सूल काढण्यात आल्या. तपासणी दरम्यान, त्या महिलेच्या शरीरामध्ये कोकेन हा अंमली पदार्थ असल्याचं आढळून आलं.

डीआरआयच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या कोकेनचे एकूण वजन 190 ग्रॅम इतके होते. आंतरराष्ट्रीय अवैध बाजारपेठेत त्याची अंदाजित किंमत सुमारे 1 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याची शक्यता आहे. एजन्सीने अंमली पदार्थ आणि मानसोपचारविषयक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985 अंतर्गत हे अमली पदार्थ जप्त करत त्या परदेशी महिलेला अटक केली. पुढे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश करण्याच्या आणि त्यात सामील असलेल्या इतर लोकांची ओळख पटवण्याच्या उद्देशाने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. त्या दृष्टीनेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या विमानतळ प्रशासन आणि महसूल गुप्तचर संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, 20 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयने भोपाळमधील आंतरराज्य बस टर्मिनल (आयएसबीटी) येथे आणखी एका कारवाईत 9.139 किलोग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीहून बंगळूरला जाणाऱ्या बसमध्ये भोपाळला पोहोचल्यावर एका पुरुष प्रवाशाला अडवले. त्याच्या सामानाची झडती घेतली असता, दोन मध्यम आकाराच्या ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेल्या सलवार सुटकेसमध्ये लपवलेली 11 प्लास्टिकची पाकिटे सापडली. चाचणीत पॅकेटमध्ये क्रिस्टलाइन मेथॅम्फेटामाइन असल्याची पुष्टी झाली. जप्त केलेले अंमली पदार्थ ताब्यात घेत आरोपीला एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली.

हवाई आणि आंतरराज्यीय वाहतुकीद्वारे देशात होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालणे हा या कारवाईचा उद्देश आहे. अंमली पदार्थमुक्त भारताच्या मोहिमेचा एक भाग म्हणून तस्करी करणाऱ्या नेटवर्कवर कारवाई सुरूच राहील, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाने दिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >